मत कुणाला देऊ? प्रचार संपला, विचार सुरू; आता भेटीगाठी व गुप्त बैठकांवर जोर

Maharashtra assembly elections 2024 : गेला महिनाभर राज्यभर सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा अखेर सोमवारी सायंकाळी खाली बसला.
मत कुणाला देऊ? प्रचार संपला, विचार सुरू; आता भेटीगाठी व गुप्त बैठकांवर जोर
Published on

मुंबई : गेला महिनाभर राज्यभर सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा अखेर सोमवारी सायंकाळी खाली बसला. प्रचार थंडावल्याने मिळणाऱ्या एक दिवसाच्या शांततेत महाराष्ट्रात गेली अडीच वर्षे सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणातून राज्याची कशी सुटका करायची याचा विचार करण्यास मतदारांना वेळ मिळाला आहे आणि मतदारांमध्ये तसा विचार सुरूही झाला आहे. त्यामुळे बुधवारी २० नोव्हेंबरला होणारे मतदान उत्कंठावर्धक ठरणार आहे.

दरम्यान, आता राजकीय पक्षांकडून भेटीगाठी व गुप्त बैठकांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही सुरू होणार असून, मतदारांना पैसे व भेटवस्तू वाटण्याचेही प्रकार होण्याची शक्यता आहे. पण निवडणूक आयोगाने असे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून करडी नजर ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीसाठी आपली पूर्ण ताकद खर्ची घातली, तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप) अध्यक्ष शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घाम गाळत मतदारांना आपल्यामागे उभे ठाकण्याचे आवाहन केले.

खरा मूळ पक्ष कुणाचा, सिद्ध करण्याची संधी

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना या निवडणुकीद्वारे आपलाच गट खरा राष्ट्रवादी व शिवसेना आहे हे दाखवून देण्याची नामी संधी आहे. त्यात शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात सभा घेत अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. भाजपने आपल्याला कसा धोका दिला? व एकनाथ शिंदे यांनी आपल्याशी कशी गद्दारी केली? हे उद्धव ठाकरे यांनी मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.

महायुतीचा संपूर्ण जोर हिंदुत्वावर

दुसरीकडे, भाजप व महायुतीचा संपूर्ण प्रचार हिंदुत्वाच्या मुद्द्याभोवती फिरता राहिला. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात महायुतीने विकासाच्या जोरावर मते मागितली. पण त्यानंतर हा प्रचार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या 'बटेंगे तो कटेंगे' व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक है, तो सेफ है'च्या दिशेने पुढे सरकला. आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही महायुतीने या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा चढवत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

logo
marathi.freepressjournal.in