मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून शनिवारी निकाल जाहीर होणार आहे. सत्तेत कोण येणार, याबाबत अस्पष्टता असली तरी सत्ता स्थापनेचे दावे-प्रतिदावे महायुती आणि मविआकडून केले जात आहेत. सत्तेच्या जवळ पोहोचल्यावर काही जागांसाठी सत्ता निसटू नये यासाठी महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अपक्ष व बंडखोरांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे निकालापूर्वीच बंडखोर व अपक्षांचा ‘भाव’ वधारला आहे. सत्ता स्थापनेसाठी महायुती आणि मविआकडून सध्या जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि विविध राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले. मात्र, पक्षाशी एकनिष्ठ राहून वर्षानुवर्षे सेवा करूनही उमेदवारी न मिळाल्याने नाराज इच्छुकांनी बंडाचे हत्यार उपसले. बंडखोरांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे केले. या बंडखोरीमुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली. पक्षश्रेष्ठींनी बंडखोरांवर दबावही आणला, मात्र बंडखोर आपल्या बंडखोरीवर ठाम राहिल्याने भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अप), राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना (उबाठा) व शिवसेना शिंदे गटाने बंडखोरावर कारवाई करत त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. मात्र, आता याच अपक्ष व बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार राहण्याची शक्यता असल्याने त्यांची मनधरणी करण्यात येत आहे.
निकालापूर्वीच अपक्ष व बंडखोरांचा ‘भाव’ वधारला
शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महायुती असो वा महाविकास आघाडी, सत्ता स्थापण्यासाठी त्यांना चांगलीच कसरत करावी लागणार असल्याचा मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज आहे. सत्ता स्थापनेसाठी १४५ ची ‘मॅजिक फिगर’ गाठणे दोन्ही आघाड्यांना गरजेचे आहे. त्यामुळे महायुती असो वा महाविकास आघाडीला १३० वर त्यांचे गाडे अडल्यास त्यावर उपाय म्हणून अपक्ष व बंडखोरांना विविध राजकीय पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी साद घातली आहे. त्यामुळे अपक्ष व बंडखोरांची सध्या चलती आहे. त्यामुळे शनिवारी निकाल लागण्यापूर्वीच अपक्ष व बंडखोरांचा भाव वधारला आहे.