
मुंबई शहराचा समावेश असलेला महाराष्ट्रातील कोकण विभाग, पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. विशेषतः दोन प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटांमध्ये कोकण किनारपट्टयात वर्चस्व स्थापित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तेचे पारडे फिरवण्यासाठी कोकण विभागातील विधानसभेच्या ७५ जागा निर्णायक ठरणार आहेत.
महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरीकरण झालेला तसेच औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर असलेला कोकण विभाग, ज्यामध्ये मुंबई महानगर क्षेत्राचाही समावेश आहे, येत्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याचे कारण म्हणजे या भागातून विधानसभेसाठी तब्बल ७५ आमदार आणि लोकसभेसाठी १२ खासदार निवडून दिले जातात. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या कोकण विभागात पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचाही समावेश होतो. मागील लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीने कोकणातील सात जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपने पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि मुंबई उत्तर या जागांवर विजय मिळवला, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील
राष्ट्रवादी काँग्रेसला रायगडमध्ये दिलासा मिळाला, जिथे सुनील तटकरे यांना आपली जागा राखण्यात यश आले होते. शिंदे यांच्या शिवसेनेने ठाणे, कल्याण आणि मुंबई उत्तर पश्चिम या जागा जिंकल्या. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजय झालेले माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आगामी निवडणुकांमध्येही भाजपसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील असे दिसते.
शहरी समस्या, जसे की गृहनिर्माण क्षेत्रातील समस्या, शहरातील वाढत्या गरिबीची समस्या आणि पायाभूत सुविधांच्या समस्या, यांसोबतच वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येची समस्या प्रामुख्याने निवडणुकीतील प्रामुख्याने चर्चिले जाणारे विषय आहेत. मुंबईत, जिथे कॉंग्रेसने महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला स्थान दिले आहे तेथील काँग्रेसचा प्रभाव गेल्या काही वर्षात कमी झाला आहे. कोकणपट्टयात येणाऱ्या ७५ मतदारसंघांमध्ये आदिवासीबहुल पालघर (६ जागा), ठाणे (१८), ज्यामध्ये ठाणे शहरातील सहा मतदारसंघ, मुंबई (३६) आणि रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १५ मतदारसंघांचा समावेश आहे. अंतर्गत स्पर्धा आणि बदलत्या आघाड्यांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकीय चित्र गुंतागुंतीचे दिसून येत आहे.
कोकण विभागात २०१९ मधील पक्षनिहाय स्थिती
मुंबई ठाणे/कोकण (७५ जागा)- शिवसेना २९, काँग्रेस ४, भाजप २७, सीपीएम १, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, राष्ट्रवादी ६, मनसे १ आणि अपक्ष २
वरळी ठाण्यात दोन्ही सेनेमध्ये अटीतटीची लढत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील कोपरी- पाचपाखडी मतदारसंघात आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे पुन्हा निवडणूक लढवत असलेला वरळी मतदारसंघ, या दोन्ही जागांवर अटीतटीची लढत होणार आहे. या निवडणुकीत मुख्यत्वे दोन्ही शिवसेना गटांमधील स्पर्धा तीव्र होत असल्याने निवडणूक रंगतदार ठरणार आहे.