सोलापूर : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. दिवाळीनंतर किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होतील, असे अंदाज वर्तवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या १५ दिवसांत आचारसंहिता लागेल, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची 'जन सन्मान यात्रा' सोलापूरमधील मोहोळ शहरात दाखल झाली. यावेळी ते बोलत होते. पवार यांच्या उपस्थितीत महिलांचा संवाद मेळावा झाला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासह स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते.
माझा दौरा रद्द करणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे!
मोहोळ येथे अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वीच अजित पवार गटातील नेते उमेश पाटील यांनी ‘मोहोळ बंद’ची हाक दिली. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात विघ्न आले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. ‘अजित पवारचा दौरा रद्द करणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे. तुम्ही काळजी करू नका’, असे ते म्हणाले.
मोहोळकरांना कोणत्याही निधीची कमतरता भासू देणार नाही. सर्वांनी भरभरून पाठिंबा आणि आशीर्वाद दिले. मिळालेल्या पदाचा आणि संधीचा वापर करु. जनतेचा विकास कसा करता येईल यासाठी मी प्रयत्न करत असतो. आपण लोकांशी लबाडी करायची नाही, फसवायचे नाही," असे ते म्हणाले.
सरकारमध्ये काम करण्यासाठी सामील झालो. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अडीच वर्षे होतो, तेव्हा सेक्युलर विचारधारा सोडली नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांना आवाहन आहे, कोणतीही जात, धर्म एकमेकांचा आकस करत नाही. महाराष्ट्रात काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापासून सावध राहण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
गरिबाला दीड हजाराची किंमत माहिती आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्याला काय माहिती आहे. धुणेभांडी करणारे, झोपडपट्टीत काम करणाऱ्यांना माहिती आहे. या योजनेला विरोध करणाऱ्यांना कोर्टाने धुडकावून लावले. विरोधक सत्तेवर येतील तर ही योजना बंद करतील, असे ते म्हणाले.
अजित पवारांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला व त्यांना निवेदन दिले. यावेळी अजित पवार यांनी भर पावसात थांबून मराठा समाजाच्या मागण्या ऐकून घेतल्या.