संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रएएनआय

मविआ १८० जागा जिंकेल, महायुतीने विरोधी पक्षनेता ठरवावा: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेता कोणाला करायचे याचा विचार भाजपप्रणीत महायुती सरकारने करावा.
Published on

पंढरपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेता कोणाला करायचे याचा विचार भाजपप्रणीत महायुती सरकारने करावा. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (मविआ) १८० जागा मिळणार आहेत, असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी येथे रविवारी व्यक्त केला.

ते म्हणाले की, ‘मविआ’चा दणदणीत विजय झाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करू, तर ‘महायुती’ सरकारने आपला विरोधी पक्षनेता कोण असेल हे निश्चित करावे. ‘एक देश-एक निवडणूक’ ही संकल्पना कागदावर चांगली दिसते. पण, ती वास्तवाला धरून नाही. सरकारला इतकाच कळवळा असता, तर हरयाणाच्या निवडणुकीसोबत महाराष्ट्राच्या निवडणुका घेतल्या असत्या. जनतेच्या पैशातून आणखी प्रचार मोहीम राबवली नसती, असा टोला त्यांनी मारला.

लोकसभा निवडणुकीत ‘मविआ’ने राज्यात ४८ पैकी ३० जागा जिंकल्या. आता विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’ चांगलीच कामगिरी करेल. जागावाटपात उमेदवाराची विजयी होण्याची शक्यता पडताळून जागावाटप केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत १७ पैकी १३ जागा जिंकल्या. तसेच सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीत ‘महायुती’ला केवळ १७ जागा मिळाल्या, तर भाजपला केवळ ९ जागा मिळाल्या. ‘मविआ’ला येत्या निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळेल, तर विरोधकांना २८८ पैकी केवळ १००-१२५ जागा मिळतील, असे थोरात यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in