मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठीची मतमोजणी आज (शनिवारी) सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. राज्य विधानसभेच्या महासंग्रामात महायुती जिंकणार की महाआघाडी सत्तेचा सोपान गाठणार याविषयीची मतदारांमधील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
भाजप, शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची महायुती, तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट व शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांची महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळत आहे. या निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ फलदायी ठरणार की, ‘सरकार पाडापाडी’ भोवणार? या प्रश्नांची उत्तरे निकालातून मिळणार आहेत. यंदाचे जास्तीचे मतदान कुणाच्या बाजूने झुकणार याचीही उत्सुकता वाढली आहे. ही निवडणूक म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यात शिवसेनेचे आदित्य ठाकरे, मनसेचे अमित ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युगेंद्र पवार यांचीही कसोटी लागणार आहे. या निवडणुकीत मुंबई, ठाणे व कोकणवर वर्चस्व महाआघाडीचे राहणार की महायुतीचे याचाही निकाल लागणार आहे. तसेच, विदर्भ, मराठवाड्यात कुणाची सरशी होणार याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे.
मतमोजणीला सुरूवात झाली असून कल आणि निकाल येण्यास सुरूवात झाली आहे. बघूया सर्व अपडेट्स
सकाळी १२.३० वाजेपर्यंतचे २८८ जागांवरील कल
महायुती - २२०
मविआ - ५७
अन्य - ११
पक्षनिहाय कल
भाजप - १२६
शिवसेना (शिंदे गट) -५७
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ३७
काँग्रेस - १९
शिवसेना (उबाठा) - १९
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १९
(बातमी आणि आकडे अपडेट होत आहेत.)