
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा निसर्गाचा कहर ओढवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या ट्रॉपिकल सायक्लोन ॲडव्हायजरी क्रमांक ०३ नुसार, ‘शक्ती’ या नव्या चक्रीवादळामुळे ३ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा तडाखा बसू शकतो.
कोणते जिल्हे धोक्याच्या क्षेत्रात?
‘शक्ती’ चक्रीवादळाचा प्रभाव मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांवर सर्वाधिक जाणवण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने यासंदर्भात सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाऱ्यांचा वेग वाढणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यास वाऱ्यांचा वेग ६५ किमी प्रतितास किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे झाडे उन्मळून पडणे, वीजवाहिन्या खंडित होणे, तसेच सागरी भागातील वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ शकतात.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ५ ऑक्टोबरपर्यंत समुद्र अतिशय खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना या कालावधीत समुद्रात न जाण्याचे स्पष्ट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. किनारपट्टी भागात भरतीदरम्यान लाटा उंच उसळण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी सागरी किनाऱ्यांपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
पाऊस व पूरस्थितीची शक्यता
चक्रीवादळामुळे केवळ कोकणच नव्हे, तर पूर्व विदर्भ, मराठवाड्याचे काही भाग आणि उत्तर कोकणातही प्रचंड ढगांची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे या भागांत तीव्र ते अतितीव्र पावसाची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचणे, नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण होणे, तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
शासन आणि प्रशासनाची तयारी
राज्य शासनाने सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे, आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्याचे आणि आवश्यकतेनुसार स्थलांतर योजना तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ दलांनाही आवश्यकतेनुसार तत्काळ कार्यवाहीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन
राज्य सरकारने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत सूचनांवर अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या अधिकृत वेबसाइट आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सोशल मीडिया चॅनेल्सवरून अद्ययावत माहिती घेत राहावी, तसेच मुसळधार पावसाच्या काळात अनावश्यक प्रवास टाळावा, असा सल्ला देण्यात आला आहे.