
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विचारले असता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच माध्यमांनाही सुनावले आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने अजित पवारांची प्रतिक्रिया एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली आहे. अजित पवार म्हणाले, ''सरकारमध्ये असताना देवेंद्र फडणवीस असो किंवा मी महाराष्ट्रातील प्रत्येक भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.''
तसेच यावेळी त्यांनी माध्यमांनाही सुनावले आहे. पवार म्हणाले, ''तुम्ही आम्हाला सैफवरील हल्ल्याबाबत विचारता मात्र, तुम्ही संपूर्ण माहिती न घेताच वेगवेगळे किस्से रंगवले.''
ते पुढे म्हणाले, ''सध्या सीसीटीव्ही तपासले जात आहेत. आता आम्ही आरोपी नेमके चोरीच्या उद्देशाने गेले होते की अन्य काही उद्देश होता याचाही तपास घेत आहोत.''
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी, अहिल्यानगर येथे आज अधिवेशन आहे. अधिवेशनापूर्वी अजित पवार यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार याही उपस्थित होत्या. अधिवेशनासाठी प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मोठे नेते उपस्थित आहेत.
हल्लेखोराचा नवा फोटो समोर
ज्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत, त्याचा नवा फोटो समोर आला आहे. आरोपी मुंबईतच फिरताना आढळून आला असून, त्याने कपडेही बदलल्याचे नव्या समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे. आरोपी घटनेनंतर पसार झाला. याचदरम्यान, त्याने कपडे बदलले. त्यानंतर तो वांद्रे स्थानकावर गेला. जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात संशयित आरोपी हाताची घडी घालून चालताना दिसत आहे. वांद्रे स्थानकाबाहेर तो फिरत होता. त्याचवेळी तो एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. संशयित आरोपीने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्या पाठीवर काळ्या रंगाची बॅग आहे. हे सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर पोलिसांनी सदर परिसरात चौकशीही सुरू केली आहे.