
महाराष्ट्रात गेल्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, राज्यातील तब्बल ६० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, ओला दुष्काळ जाहीर होणार नाही, पण सर्व सवलती लागू होतील. बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाईल.
ओला दुष्काळ जाहीर नाही, पण सर्व सवलती लागू
विरोधकांकडून 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी होत होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की अधिकृत नियमावलीत अशा प्रकारची संकल्पनाच नाही. तरीदेखील, दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती आणि सुविधा पूरग्रस्त व पावसामुळे बाधित शेतकऱ्यांनाही लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन-तीन दिवसांत नुकसानीचा अंतिम अहवाल
अजूनही अनेक ठिकाणी पाणी साचलेले असल्याने नुकसानीचे संपूर्ण मूल्यांकन होऊ शकलेले नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर राज्य सरकार एक संपूर्ण धोरण (Comprehensive Policy) जाहीर करेल आणि केंद्र सरकारकडे मदत पॅकेजसाठी प्रस्ताव पाठवला जाईल.
पहिल्या टप्प्यात २,११५ कोटींचे वाटप सुरू
ऑगस्टपर्यंत झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी २,११५ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. त्याशिवाय, खरीप हंगामात झालेल्या प्रचंड नुकसानीसाठी अतिरिक्त निधी दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांना कर्ज वसुलीची नोटीस?
अनेक शेतकरी पुर आणि अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेले असताना बँकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा दिल्या जात असल्याची माहिती पुढे आली होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की या नोटिसा जुन्या कर्जांसाठी आहेत. मात्र, बँकांना कर्ज वसुलीची कारवाई थांबवण्याचे आदेश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, सप्टेंबरमधील पावसामुळे २४ जिल्ह्यांतील १३७ तालुक्यांमध्ये २६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तरीदेखील केंद्राकडून मदतीचा प्रस्ताव तातडीने पाठवण्यात आलेला नाही आणि केंद्रीय पथके अद्याप पाहणीसाठी आलेली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक फटका
मराठवाड्यातील लातूर, बीड, नांदेड, परभणी, धाराशिव, जालना, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. लाखो हेक्टरवरील खरीप पिके पाण्यात गेल्याने रब्बी हंगामही धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन
"शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी खात्यात मदत मिळेल याची खबरदारी घेऊ. नुकसानाची अचूक आकडेवारी मिळाल्यानंतर व्यापक मदत पॅकेज जाहीर केले जाईल," असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.