मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही महायुती व महाविकास आघाडीमध्ये बेदिलीची चित्र स्पष्ट झाले. दोन्ही आघाड्यांमध्ये बंडखोरी, आयाराम गयाराम, शह-काटशह, नाराजीनाट्य, मनधरणी असे विविध प्रकार एकाचवेळी सुरू होते. दोन्ही आघाड्यांनी जागावाटपाचे जाहीर केलेले फॉर्म्युले बासनात गुंडाळल्याचे दिसून आले.
जवळपास सहा मतदारसंघांमध्ये मविआचे दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. तर, चार मतदारसंघात महायुतीच्या दोन पक्षांचे उमेदवार दोस्तीत एकमेकांचा काटा काढताना दिसणार आहेत. ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने काही उमेदवार दबावानंतर माघार घेऊ शकतात.
महायुतीचा फॉर्म्युला
भाजप १४८
शिंदेंची शिवसेना = ८५
अजित पवारांची राष्ट्रवादी = ५१
आरपीआय = १
युवा स्वाभिमानी पक्ष = १
जनसुराज्य = १
रासप = १
मविआचा फॉर्म्युला
काँग्रेस = १०२
ठाकरेंची शिवसेना - ९६
शरद पवारांची राष्ट्रवादी = ८७
मित्र पक्ष = ३
एकूण १०,९०५ अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. आतापर्यंत एकूण ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. मंगळवारी एका दिवसात एकूण ४ हजार ९९६ उमेदवारांचे एकूण ६ हजार ४८४ नामनिर्देशन पत्र दाखल झाले.