
भारताचा पहिला इलेक्ट्रिक महामार्ग कॉरिडॉर आता महाराष्ट्रात साकार झाला आहे. देशातील हा पहिलाच ‘ई-हायवे’ मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख औद्योगिक शहरांना जोडतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. १७) या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन केले. हरित वाहतूक आणि स्वच्छ ऊर्जेकडे राज्याची वाटचाल अधिक गतीमान करणारा हा उपक्रम ठरला आहे.
ग्रीन महामार्गांचे जाळे
महाराष्ट्र सरकारने २०२८ पर्यंत राज्यातील सर्व प्रमुख महामार्गांचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबई-पुणे इलेक्ट्रिक कॉरिडॉर हा त्या व्यापक ‘ग्रीन रोड नेटवर्क’ योजनेतील पहिला टप्पा आहे. या मार्गावर अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन आणि बॅटरी-स्वॅप केंद्रांचे जाळे उभारण्यात येत आहे, ज्यामुळे प्रवाशांना आणि मालवाहतूक वाहनांना अखंड, प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव मिळेल.
'मेड-इन-इंडिया’ इलेक्ट्रिक ट्रकचे अनावरण
उद्घाटन सोहळ्यातच फडणवीस यांनी देशातील पहिला ‘मेड-इन-इंडिया’ इलेक्ट्रिक हेवी-ड्युटी ट्रक सादर केला. हा ट्रक ब्ल्यू एनर्जी मोटर्स या पुणेस्थित कंपनीने विकसित केला आहे. बॅटरी-स्वॅप तंत्रज्ञानावर आधारित हा ट्रक दीर्घकाळ चार्जिंग, वेळेची अडचण दूर करून कार्यक्षमतेत वाढ करतो. कंपनीच्या मते, पुढील काही वर्षांत या ट्रकची क्षमता एकाच चार्जवर ४०० किलोमीटर प्रवास करण्याइतकी वाढेल.
ब्ल्यू एनर्जी - राज्य सरकारचा मोठा करार
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार आणि ब्ल्यू एनर्जी मोटर्स यांच्यात ३,५०० कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार (MoU) झाला आहे. कंपनी राज्यात एक नवीन उत्पादन केंद्र उभारणार असून, दरवर्षी ३०,००० इलेक्ट्रिक ट्रकांचे उत्पादन करण्याची क्षमता असेल. या गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मितीबरोबरच इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला मोठा चालना मिळणार आहे.
स्वच्छ ऊर्जा आणि हरित भविष्य
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राने सौरऊर्जा आणि पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन दिले असून, २०३५ पर्यंत राज्याच्या एकूण ऊर्जा गरजांपैकी ७० टक्के गरजा सौर प्रकल्पांमधून पूर्ण होतील. या उपक्रमामुळे कार्बन उत्सर्जनात मोठी घट होऊन राज्य हरित ऊर्जेचे केंद्रबिंदू बनेल.
पुढचा टप्पा - नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर
मुंबई–पुणे कॉरिडॉरनंतर राज्य सरकारचे उद्दिष्ट नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूर यांसारख्या शहरांना इलेक्ट्रिक महामार्गांच्या जाळ्यात जोडण्याचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशातील इलेक्ट्रिक वाहन चळवळीचा अग्रणी राज्य म्हणून उदयास येत आहे.