मराठवाड्यात पावसाचा कहर; जळगावमध्ये पूरस्थिती, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ, घाट परिसरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जळगावसह मराठवाडा सर्वाधिक प्रभावित आहे.
मराठवाड्यात पावसाचा कहर; जळगावमध्ये पूरस्थिती, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Published on

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ, घाट परिसरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जळगावसह मराठवाडा सर्वाधिक प्रभावित आहे. जळगाव जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे.

जळगावमध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात मध्यरात्री ढगफुटी सदृश पावसाने धुमाकूळ घातला. या मुसळधार पावसामुळे दगडी नदीसह अनेक नाल्यांना अचानक पूर आला. परिसरातील वडगाव (कडे), शिंदाड, वाणेगाव, निंभोरी, राजुरी, वाडी शेवाळे, सार्वे, पिंप्री या गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. सातगाव डोंगरीकडून मराठवाड्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागून काढली. पुराच्या पाण्यात शेकडो जनावरं आणि पशुधन वाहून गेले आहे. अनेक घरांत पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे यांचे प्रचंड नुकसान झाले. सातगाव डोंगरी धरण ओसंडून वाहू लागल्याने शेजारील गावांमध्ये पाण्याचा लोंढा शिरला.

मराठवाड्यातील परिस्थिती

मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. ३२ महसूल मंडळांत अतिवृष्टी नोंदवली गेली असून, नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

शेतकऱ्यांची १५ लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. माती वाहून गेल्यामुळे पिकांचं अपरिमित नुकसान झालं आहे. शेतांबरोबरच घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामीण भागातील जीवन विस्कळीत झाले आहे.

पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाचा तडाखा

पुणे जिल्ह्यात ५५ महसूल मंडळांत मुसळधार पाऊस झाला असून, उरूळीकांचन येथे सर्वाधिक १४२.५ मिमी पावसाची नोंद झाली. नागपूरमध्ये सोमवारी विजांच्या कडकडाटासह तीव्र सरी बरसल्या, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड झालं. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन रस्त्यांचा संपर्क तुटला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंजना-पळशी नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नादपूर येथील स्मशानभूमी पुराच्या पाण्यात गेली आहे.

विद्यार्थ्यांना दोराने बाहेर काढलं

नागपूरमध्ये शाळांच्या आवारात पाणी साचल्याने अडचणी निर्माण झाल्या. कोराडी मार्गावरील मॉडर्न स्कूलमध्ये पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यावर बाहेर काढणं कठीण झालं. अखेर दोराच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर आणण्यात आलं.

logo
marathi.freepressjournal.in