नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची प्रक्रिया वेगात आणली आहे. राज्यभर बंदी असतानाही गुटख्याचे मोठ्या प्रमाणात होणारं तस्करीचं जाळं मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लागू करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केल्याबद्दल अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज (दि.१०) मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि.९) विधानसभेत स्पष्ट सांगितले की, "कडक कायदेशीर कारवाईच्या दिशेने प्रक्रिया सुरू आहे. अनेक वेळा जप्ती केल्यानंतरही गुटखा पुन्हा बाजारात आणला जातो, त्यामुळे कडक कायद्याची गरज निर्माण झाली आहे."
FDAच्या प्रस्तावाला गती; ‘मकोका’ अंतर्गत कारवाईची तयारी
अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितले की, "FDA ने सादर केलेल्या प्रस्तावाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संघटित स्वरूपात गुटखा तस्करी करणाऱ्या समूहावर ‘मकोका’सारखा कठोर कायदा लावण्याचा मार्ग मोकळा होत आहे. तसेच गुटखा विक्रेत्यांप्रमाणे आता सुंगधी सुपारीची विक्री करणाऱ्यांवरसुद्धा बंदी घालण्यात येणार आहे. त्यांनाही मकोकाच्या कक्षेत आणले जाणार आहे." असे नरहरी झिरवळ यांनी सांगितले.
कायदानिर्मिती विभागाला याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे झिरवळ यांनी सांगितले.
शाळा-कॉलेजजवळ बेकायदेशीर विक्रीचा मुद्दा गंभीर
गुटखा आणि सुगंधी सुपारीचे पॅकेट्स शाळा व कॉलेज परिसरात सहज उपलब्ध होत असल्याने अल्पवयीन मुलांवर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अनेक दुकानदारांवर कारवाई करूनही विक्री पुन्हा सुरू होत असल्याचे FDAचे निरीक्षण आहे.
गुटखा तस्करीचे भीषण प्रमाण
१ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राज्यभरात झालेल्या कारवायांचा आढावा:
३६५ दुकानांवर छापे
त्यापैकी ३५४ दुकानांत प्रतिबंधित गुटखा/सुपारी आढळली
₹२२.१७ कोटींचा माल जप्त
सरकारचा स्पष्ट इशारा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "गुटखा आणि अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात अधिक मजबूत कायदेशीर चौकट तयार करत आहोत. मकोका लागू करण्याचा निर्णय लवकरच पूर्णत्वास येईल."