रक्त केंद्रांवर आरोग्य विभागाची नजर; दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन जणांचे पथक, धडक तपासणी मोहीम राबवणार

राज्यातील रक्तसाठा व्यवस्थापन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे राज्यभरातील रक्त केंद्रांवर धडक अचानक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
रक्त केंद्रांवर आरोग्य विभागाची नजर; दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन जणांचे पथक, धडक तपासणी मोहीम राबवणार
रक्त केंद्रांवर आरोग्य विभागाची नजर; दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन जणांचे पथक, धडक तपासणी मोहीम राबवणार'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : राज्यातील रक्तसाठा व्यवस्थापन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे राज्यभरातील रक्त केंद्रांवर धडक अचानक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी दोन वैद्यकीय अधिकारी व एक वित्त विभागातील अधिकारी अशा तीन जणांचे पथक सरप्राइज व्हिझिट करत तपासणी करणार असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेने सांगितले.

राज्य रक्त संक्रमण परिषदेने २७ जून २०२६ रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार ही विशेष अचानक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, १९४० तसेच त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार रक्त हे औषध म्हणून वर्गीकृत असल्याने त्याचे संकलन, प्रक्रिया, साठवण आणि वितरणामध्ये उच्च दर्जाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि पारदर्शकता राखणे बंधनकारक आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अलीकडील तपासण्यांमध्ये काही रक्तकेंद्रांमध्ये गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.

तपासणीदरम्यान रक्त केंद्रांच्या कार्यपद्धतीची सखोल पडताळणी करण्यात येत आहे नियमीतपणे ही तपासणी पुढेही सुरू राहील. रक्त संकलनाची गरज आणि प्रत्यक्ष संकलन, रक्तघटकांचे इतर राज्यांमध्ये होणारे हस्तांतरण, प्लाझ्मा फ्रॅक्शनेटर्सना पुरवठा, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन, ई-रक्तकोष प्रणालीवरील रक्तसाठ्याची अद्ययावत नोंद, रक्त व रक्तघटकांच्या प्रक्रिया शुल्काची माहिती दर्शविणारे फलक, तांत्रिकदृष्ट्या पात्र मनुष्यबळाची उपलब्धता, रक्तसाठ्याचे अंकेक्षण, रक्तपिशव्यांचा वापर व नोंदी, तसेच रक्तकेंद्रात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंद आणि त्यावरील कार्यवाही अशा विविध मुद्द्यांची तपशीलवार तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार आहे.

राज्य रक्त संक्रमण परिषदेने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक रक्त केंद्रातील सेवा गुणवत्ता, रक्तसाठा व्यवस्थापन, आवश्यक नोंदी आणि नियमांचे पालन याची बारकाईने पडताळणी करण्यात येत आहे. संबंधित पथकांना तपासणीनंतरचा सविस्तर अहवाल राज्य रक्त संक्रमण परिषद तसेच अन्न व औषध प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मोहीम सुरूच राहणार!

या तपासणी मोहिमेत ज्या रक्तकेंद्रांमध्ये नियमांचे उल्लंघन, अनियमितता किंवा गंभीर त्रुटी आढळतील, त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. या अचानक तपासणी मोहिमेमुळे राज्यातील रक्त पेढी केंद्रांना अधिक दक्षतेने काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच पुढे ही मोहीम सुरू राहील, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in