
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात सोमवारी (३० जून) मोठ्या नाट्यमय घडामोडींनी झाली. राज्य सरकारने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हिंदी सक्तीचा जिआर रद्द केला असला तरी महाविकास आघाडीने मुंबईतील विधानभवनाबाहेर शाळांमध्ये हिंदी ही सक्तीची तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शने केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी महायुती सरकारवर 'मराठी अस्मितेचा अपमान' केल्याचा आरोप करत, घोषणा देत आणि पोस्टर्स दाखवत आपला रोष व्यक्त केला. निदर्शनामध्ये प्रमुख नेते म्हणून आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन अहिर आणि जितेंद्र आव्हाड यांचा सहभाग होता.
मागे घेतला वादग्रस्त ठराव -
१६ एप्रिल आणि १७ जून रोजी शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या दोन शासकीय ठरावांनुसार, राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून मराठी, इंग्रजी आणि हिंदी या त्रिभाषिक सूत्राची सक्ती होणार होती. मात्र, या निर्णयाला विरोधी पक्षांसह नागरिकांकडूनही तीव्र विरोध झाला. या निर्णयाविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात पहिल्यांदा एकाच मुद्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता होती.
सरकारने नागरिकांचा रोष पाहता परिस्थितीचा विचार करून रविवारी (२९ जून) हे ठराव मागे घेतले. तरीही, विरोधकांनी आपली हिंदी विरोधाची आक्रमक भूमिका कायम ठेवली असून, सरकारकडून पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी केली जात आहे.
संजय राऊत यांची टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषिक धोरण माशेलकर समितीच्या शिफारशींनुसार मागील MVA सरकारनेच मंजूर केल्याचा दावा केला होता. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ''भाजपचे खोटे बोलण्याचे राष्ट्रीय धोरण आहे. या धोरणाने हे लोकं महाराष्ट्रात काम करतात. खोटं बोलतात. उद्धव ठाकरे यांनी माशेलकर कमिटीचा रिपोर्ट केला असेल तर समोर आणा. एका कमिटीचा रिपोर्ट समोर आला आहे, तो कॅबिनेटमध्ये ठेवला आहे. त्यावर चर्चा होऊ शकत नाही? तुम्ही हिंदी सक्ती बद्दल कॅबिनेटमध्ये चर्चा केली ना? का तर ते राष्ट्रीय धोरण आहे. जर कोणतं राष्ट्रीय धोरण राज्यासमोर आणले जाते तर त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस तीनदा मुख्यमंत्री बनले, का त्यांना एवढं पण ज्ञान नाही?'' असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
या विषयावर विधानसभेतही तीव्र चर्चा होण्याची शक्यता आहे. मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा राज्यात राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.