Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा परिणाम शिक्षणक्षेत्रावरही झाला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने अखेर राज्य शासनाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ
संग्रहित छायाचित्र
Published on

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा परिणाम शिक्षणक्षेत्रावरही झाला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने अखेर राज्य शासनाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. राज्य परीक्षा मंडळाने अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरवरून २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.

राज्यात मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगरसह अनेक भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते वाहतूक विस्कळीत, शाळा-महाविद्यालयांचे कामकाज ठप्प, तर इंटरनेट आणि वीजपुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येत नव्हता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली.

या मागणीची दखल घेत शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना तत्काळ दूरध्वनीवरून निर्देश दिले. त्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगितले. शिक्षण विभागाने त्वरेने निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा देणारे परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

इतर महत्त्वाचे निर्णय :

  • नियमित बारावी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

  • बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली

  • नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर निश्चित

या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला असून, पूरपरिस्थितीमुळे होणारा शैक्षणिक तोटा काही प्रमाणात टळणार आहे. पालकांनी आणि विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in