"घरात बसून राहणाऱ्यांना..." ; निवडणुकांच्या निकालावर एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांचे निकाल महापालिका निवडणुकांची दिशा दाखवणारे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासोबतच, त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
"घरात बसून राहणाऱ्यांना..." ; निवडणुकांच्या निकालावर एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
Published on

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी रविवारी (२१ डिसेंबर) जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "या निकालांकडे १५ जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांची दिशा ठरवणारा स्पष्ट संकेत म्हणून पाहिले पाहिजे," असे म्हटले. यासोबतच, निवडणुकांच्या निकालावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर अप्रत्यक्ष तोफ डागली.

सुरुवातीच्या कलानुसार भाजप, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचा समावेश असलेल्या सत्ताधारी महायुतीला राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी मिळाली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, "मतदारांनी राजकीय संघर्षाऐवजी विकासाला प्राधान्य दिले आहे."

महायुतीने २०० चा टप्पा ओलांडला

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदांसाठी व थेट अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने २०० हून अधिक ठिकाणी यश मिळवल्याचा दावा शिंदे यांनी केला. त्यांच्या मते, भाजपने ‘शतक’ पूर्ण केले असून शिवसेनेने ‘अर्धशतक’ झळकावत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे.

“हे निकाल जनतेची विकासाभिमुख भूमिका स्पष्ट करतात. महायुतीचा हा भव्य विजय येत्या महानगरपालिका निवडणुकांतही पुनरावृत्त होईल,” असे शिंदे म्हणाले.

मुंबई-ठाण्यापलीकडे शिवसेनेचा विस्तार

शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, "कोकण विभाग आजही शिवसेनेचा मजबूत आधार आहे. मात्र, पक्षाची ताकद आता केवळ मुंबई आणि ठाण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही."

“शिवसेना राज्यातील प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. जिथे काही ठिकाणी पराभव झाला, तिथेही महायुतीचा सामूहिक विजय आमच्यासाठी अधिक महत्त्वाचा होता,” असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटावर अप्रत्यक्ष टीका करताना शिंदे म्हणाले की, “घरात बसून राहणाऱ्यांना जनतेने घरातच बसवले आहे.”

“खरी शिवसेना कोणती, हे जनतेने ठरवले आहे. आमची विचारधारा बाळासाहेब ठाकरे यांची आहे. हा विजय पाहून बाळासाहेबांना निश्चितच आनंद झाला असता. जे जनतेला नाकारतात, त्यांना जनता नाकारते,” असे शिंदे म्हणाले.

संभाव्य मनसे आघाडीचा परिणाम नाही

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मनसेसोबत संभाव्य युती झाल्यास त्याचा परिणाम होईल का, या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, "त्याचा निकालांवर कोणताही प्रभाव पडणार नाही."

“जनता काम करणाऱ्यांनाच मत देते. केवळ राजकारणासाठी केलेल्या आघाड्यांचा मतदारांवर परिणाम होत नाही,” असे ते म्हणाले.

यावेळी शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या महिला लाभार्थ्यांचे तसेच पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि राज्यभर महायुतीच्या दमदार कामगिरीचे श्रेय त्यांना दिले.

logo
marathi.freepressjournal.in