

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आज (२ डिसेंबर) २६४ नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी निवडणुका पार पडत आहेत. अशातच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मतमोजणीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. "पहिल्यांदाच असं घडतंय" असे म्हणत या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
२० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता कायम
काही ठिकाणी मतदान आधी पार पडले असले, तरीही निकाल घोषित करण्याची तारीख बदलता येणार नाही, असे कोर्टाने नमूद केले आहे. यासोबतच २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता कायम राहिल, असेही कोर्टाने स्पष्ट केले असून तोपर्यंत एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यासही बंदी असणार आहे.
...पण असं पहिल्यांदा घडलं
न्यायालयाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "हा निर्णय खंडपीठाने दिला आहे, तर तो सगळ्यांना मान्यच करावा लागेल. मी मागील २५ ते ३० वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आलो आहे. पण असं पहिल्यांदा घडत आहे की, घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. त्याचे निकाल पुढे चालले आहेत. ही जी काही पद्धत आहे ती योग्य वाटत नाही", असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.
निवडणूक आयोगामुळे सर्वांचा भ्रमनिरास
पुढे ते म्हणाले, "माझी नाराजी निवडणूक आयोगावर नाही, तर संपूर्ण प्रक्रियेत दिसलेल्या उणिवांवर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अशी अव्यवस्था निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे मेहनत करणारे उमेदवार, प्रचार करणारे कार्यकर्ते यांचा भ्रमनिरास होतो. यंत्रणेच्या चुकांमुळे अशा गोष्टी घडणे योग्य नाही".
संपूर्ण प्रक्रियेत आयोगाने सुधारणा करणे अत्यावश्यक
"निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात निवडणुकांचे ओझे आहे. पण या संपूर्ण प्रक्रियेत आयोगाने सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. किमान पुढील निवडणुकांमध्ये तरी अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची खबरदारी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे", असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
२१ डिसेंबरचा दिवस निर्णायक
२० नगरपरिषदांमध्ये प्रलंबित न्यायप्रक्रियेमुळे मतदान उशिरा होत आहे. वेगवेगळ्या दिवशी निकाल जाहीर झाल्यास गैरसमज व गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशी याचिकाकर्त्यांची भूमिका कोर्टाने मान्य केली आणि निकाल एकाच दिवशी जाहीर करण्याचे निर्देश कायम ठेवले. हायकोर्टाच्या आदेशानुसार, आता राज्यातील सर्व नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरला एकत्रितरीत्या जाहीर होतील. अनेक दिवस अनिश्चिततेत असलेल्या उमेदवार, पक्ष आणि मतदारांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरला आहे.