मुंबई : महाराष्ट्रात दीर्घ प्रतीक्षेनंतरचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा मंगळवारी पार पडणार आहे. राज्यातील २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये आज मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकांनंतर होत असलेली ही लढत कुठे मैत्रीपूर्ण असेल, तर कुठे आघाडीतील तणाव आणि कायदेशीर अडचणींच्या वातावरणात होणार आहे. नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये २८८ पैकी २३५ जागांवर प्रचंड विजय मिळवलेल्या महायुतीची लाट स्थानिक पातळीवर टिकते की एकत्र येऊ पाहणाऱ्या विरोधकांच्या आघाडीचे बळ त्याला आव्हान देते, याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे.
पहिल्या टप्प्यात जवळपास एक कोटी मतदारांना आपले मतदानाधिकार बजावता येणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपर्यंत सर्व प्रलंबित स्थानिक निवडणुका पूर्ण करायच्या आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) वापरली जाणार असून मतमोजणी ३ डिसेंबरला होईल.
२ डिसेंबरच्या या निवडणुकांत भाजप नेतृत्वाखालील महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी (मविआ) यांच्यात मुख्य सामना होणार आहे. या निवडणुकांत ६,७०५ सदस्य आणि २६४ नगराध्यक्षांची निवड होणार आहे.
दरम्यान, २४ स्थानिक संस्थांच्या निवडणुका ज्या पूर्वी २ डिसेंबरला नियोजित होत्या त्या नामांकन तपासणीनंतर अर्ज फेटाळण्यासंदर्भात दाखल झालेल्या न्यायालयीन आव्हानांमुळे आता २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) शनिवारी घेतलेल्या या निर्णयामागे काही स्थानिक संस्थांमधील प्रक्रियात्मक अनियमितता कारणीभूत आहेत. त्यात माघारीसाठी अपुरा कालावधी आणि निवडणूक चिन्हवाटपातील गोंधळ यांचा समावेश आहे. अनेक प्रकरणांत जिल्हा न्यायालयांचे निर्णय २२ नोव्हेंबरनंतर दिले गेले, तसेच काही उमेदवारांना नियम १७(१)(ब)नुसार आवश्यक असलेले तीन दिवस माघारीसाठी मिळाले नाहीत. त्यामुळे २६ नोव्हेंबरनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेले चिन्हवाटप बेकायदेशीर ठरल्याचे आयोगाने स्पष्ट केले. ज्या उमेदवारीवर अपील दाखल झाले आहे, त्या विशिष्ट सदस्यस्थानांवरच स्थगन लागू असेल. न्यायालयीन निर्णय २३ नोव्हेंबरनंतर ज्या पदांबाबत दिला गेला, त्या सदस्यपद व नगराध्यक्ष पदासाठी नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार सोमवार रात्री १० वाजता समाप्त झाला असून मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे राजकीय जाहिरात किंवा प्रचारबंदी लागू असेल. रॅली, मोर्चे, लाऊडस्पीकर किंवा कुठल्याही सार्वजनिक माध्यमातून जाहिरात करण्यास मनाई आहे. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या ‘मीडिया रेग्युलेशन आणि जाहिरात प्रमाणपत्र आदेश, २०२५’ मधील तरतुदीनुसार मतदानाच्या दिवशी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही.
२४ नगरपरिषदा-नगरपंचायती, १५४ प्रभागांमध्ये मतदान २० डिसेंबरला
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी २४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह १५४ प्रभागांतील निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केला. निर्वाचन अधिकारी यांच्या आदेशांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपिलांवरील न्यायालयीन निर्णय २३ नोव्हेंबरनंतर मिळाल्यामुळे या ठिकाणांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. आयोगाने सांगितले की, या जागांसाठी मतदान २० डिसेंबर रोजी घेण्यात येईल. मात्र, इतर सर्व ठिकाणी निवडणुका २ डिसेंबर रोजी आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार पार पडतील.
यंत्रणा सज्ज
दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.