Maharashtra MLC Election : भाजपच्या बालेकिल्ल्यात मविआचे सुधाकर अडबाले विजयी

नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये (Maharashtra MLC Election) भाजपचे अनुभवी उमेदवार नागोराव गाणार यांचा भाजपच्या बालेकिल्ल्यातच केला पराभव
Maharashtra MLC Election : भाजपच्या बालेकिल्ल्यात मविआचे सुधाकर अडबाले विजयी

नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये (Maharashtra MLC Election) भाजपला (BJP) मोठा धक्का बसला. भाजपचे अनुभवी उमेदवार नागोराव गाणार (Nagorao Ganar) यांचा पराभव करत महाविकास आघाडीचे (MVA) सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात एकूण २२ उमेदवार होते. मागील २ टर्ममध्ये विजय मिळवलेले नागोराव गाणार हे हॅट्ट्रिक करतील अशी आशा भाजपला होती. त्याप्रकारे सर्व ताकद लावत भाजपने त्यांचा प्रचारही केला होता. मात्र, आज निकालादिवशी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी ट्विट करत सुधाकर अडबाले जिंकल्याची बातमी दिली.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना पेढे भरवत अभिनंदन केले. नागपूरमध्ये भाजपला धूळ चारल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अडबाले हे आघाडीवर होते. त्यांच्या आणि नागोराव गाणार यांच्यामध्ये तब्बल ७ हजारांहून अधिक मतांचे अंतर होते. एकीकडे भाजपने कोकण जिंकला तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमध्ये पराभव पत्करावा लागला.

logo
marathi.freepressjournal.in