Maharashtra MLC Election 2026 : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू; महायुती की मविआ, कोण मारणार बाजी?

२३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात २,४१९ केंद्रांवर सुमारे ७२.९६ टक्के मतदान झाले. आता मतमोजणीनंतर कोणाच्या पारड्यात किती जागा पडतात, हे स्पष्ट होणार आहे.
Maharashtra MLC Election 2026 : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू; महायुती की मविआ, कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election 2026 : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू; महायुती की मविआ, कोण मारणार बाजी?संग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज, मंगळवारी (दि. २७) मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि बंडखोर उमेदवारांचा फटका सत्ताधारी पक्षांना बसणार की विरोधी महाविकास आघाडीला त्याचा फायदा होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या या निवडणुकीत एकूण १८२ उमेदवार रिंगणात आहेत. पाचही मतदारसंघांमध्ये मिळून १० लाख ६८ हजार ७२ मतदारांची नोंदणी झाली होती. २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात २,४१९ केंद्रांवर सुमारे ७२.९६ टक्के मतदान झाले. आता मतमोजणीनंतर कोणाच्या पारड्यात किती जागा पडतात, हे स्पष्ट होणार आहे.

नागपूरमध्ये भाजपसमोर वंजारींचे आव्हान

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांच्यात प्रमुख लढत आहे. जवळपास सहा दशकांपासून भाजपच्या ताब्यात असलेली ही जागा वंजारी यांनी २०२० मध्ये जिंकली होती. त्यामुळे ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने जोर लावला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात चुरस

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या हर्षदा देशमुख-जाधव यांचे आव्हान आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे सुनील मोदी हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात सुमारे ३ लाख ८८ हजार मतदार असून, पाचही मतदारसंघांमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. या जागेसाठी एकूण ४७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीतील मतभेद

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमधील अंतर्गत मतभेद निवडणुकीत दिसून आले. भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांची काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य जयंत आसगावकर यांच्याशी लढत आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी विधान परिषद सदस्य दत्तात्रय सावंत हेही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल महायुतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात १२ मतपेट्यांच्या सीलचा मुद्दा चर्चेत

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान १२ मतपेट्यांच्या सीलवरून प्रश्न उपस्थित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार हर्षदा देशमुख यांनी २५ ऑक्टोबर रोजी स्ट्राँग रूमची पाहणी केली असता काही आक्षेप नोंदवल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी त्यांनी पुन्हा पाहणी करून यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. स्ट्राँग रूममधील सूचना आणि अभिप्राय नोंदवहीतही यासंबंधी नोंदी असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र, १२ मतपेट्यांवरील सील नेमक्या कोणत्या परिस्थितीत होते आणि याबाबत प्रशासनाने काय भूमिका घेतली, हे अधिकृत स्पष्टीकरणानंतरच स्पष्ट होईल.

छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत लढत

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विद्यमान विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांचे प्रतापसिंह पाटील यांचे आव्हान आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षानेही या मतदारसंघात उमेदवार दिला आहे. येथे सुमारे ३ लाख २६ हजार मतदार असून, एकूण ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Maharashtra MLC Election 2026 : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू; महायुती की मविआ, कोण मारणार बाजी?
पुणे विधानपरिषद निवडणुकीत महायुतीत बंडखोरीचा उद्रेक; भाजप उमेदवारांविरोधात शिवसेना व राष्ट्रवादी मैदानात

अमरावती शिक्षक मतदारसंघात बंडखोरांमुळे रंगत

अमरावती शिक्षक मतदारसंघातही महायुतीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान विधान परिषद सदस्य किरण सरनाईक यांच्याविरोधात काँग्रेसच्या अदिती पोहरे निवडणूक लढवत आहेत. भाजपचे बंडखोर उमेदवार संगीता शिंदे, शेखर भोयर आणि सुमित पवार हेही मैदानात आहेत. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे विशेष लक्ष लागले आहे.

अमरावतीत सर्वाधिक मतदान

पाचही मतदारसंघांमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक ९२.६ टक्के मतदान झाले. पुणे शिक्षक मतदारसंघात ८५.८६ टक्के, नागपूर पदवीधर मतदारसंघात ६४.८४ टक्के, पुणे पदवीधर मतदारसंघात ६२.७६ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात ५९.१२ टक्के मतदानाची नोंद झाली.

निकालाकडे लक्ष

या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमधून निर्धारित कोटा पूर्ण न झाल्यास पुढील पसंतीच्या मतांचे हस्तांतरण केले जाऊ शकते. त्यामुळे अंतिम निकालासाठी मतमोजणीच्या सर्व टप्प्यांकडे लक्ष असेल.

Maharashtra MLC Election 2026 : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू; महायुती की मविआ, कोण मारणार बाजी?
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी शांततेत मतदान; निकाल २७ ऑक्टोबरला

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर रोजी संपणार आहे.

या निकालातून महायुतीतील घटक पक्षांमधील समन्वय, बंडखोर उमेदवारांचा प्रभाव आणि महाविकास आघाडीची ताकद यांचा अंदाज येणार आहे. त्यामुळे पाच जागांचे निकाल केवळ विधान परिषदेतील संख्याबळाच्या दृष्टीनेच नव्हे, तर राज्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरणार आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in