

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २३ ऑक्टोबर रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर रोजी जारी केली जाणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश
राज्यातील पाच जागांमध्ये औरंगाबाद विभाग, पुणे विभाग आणि नागपूर विभाग या तीन पदवीधर मतदारसंघांचा, तर अमरावती विभाग आणि पुणे विभाग या दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. या पाचही जागांवरील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपणार आहे.
'असा' असेल निवडणूक कार्यक्रम
२९ सप्टेंबर - निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल.
६ ऑक्टोबर - उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख.
७ ऑक्टोबर - उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल.
९ ऑक्टोबर - उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख.
२३ ऑक्टोबर - सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.
२७ ऑक्टोबर - मतमोजणी केली जाईल.
३१ ऑक्टोबर - संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
कोणत्या जागांवर निवडणूक?
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सतीश भानुदासराव चव्हाण, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अरुण गणपत लाड, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अभिजित गोविंदराव वंजारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व किरण रामराव सरनाईक तर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व जयंत दिनकर आसगावकर करत आहेत.
बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातही निवडणूक
महाराष्ट्रासोबतच बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या जागांसाठीही द्वैवार्षिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या राज्यांतील संबंधित मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.