राज्यात पावसाचे धूमशान! १२ दिवसआधीच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन, यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस असणार

राज्यात पावसाचे धूमशान! १२ दिवसआधीच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन, यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस असणार

मान्सूनने मे महिन्यातच एंट्री घेत राज्यात धूमशान घालायला सुरुवात केली आहे. तब्बल १२ दिवस आधीच मान्सूनचे राज्यात आगमन झाले आहे.
Published on

मुंबई/पुणे/सातारा/सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने राज्याला झोडपले असतानाच, तब्बल १२ दिवस आधीच मान्सूनचे राज्यात आगमन झाले आहे. पुढील एक दोन दिवसांत मुंबईत पावसाचे आगमन होईल, असा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र मान्सूनने मे महिन्यातच एंट्री घेत राज्यात धूमशान घालायला सुरुवात केली आहे. पुणे, सोलापूर, नाशिक, सातारा येथे पावसामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केरळमध्ये आठ दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागतील, असा अंदाज होता. मात्र मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे एका दिवसातच गोव्याची वेस ओलांडून महाराष्ट्रात दाखल झाला.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असल्याने महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात मान्सूनचे आगमन झाल्याचे चित्र आहे. परिणामी कोकण किनारपट्टीसह मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी रायगड आणि रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून किनारपट्टीवरील इतर भागांत ऑरेंज अलर्ट जारी आहे. तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे, तर मुंबई आणि ठाण्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बारामती जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच तडाखा दिला. बारामती तालुक्यात रविवारी सरासरी २२६.८७ मिलिमीटर एकूण पर्जन्यमानाची नोंद झाली. पावसाच्या पाण्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले असून धान्यासह इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे निरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला आहे. पावसामुळे निरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला.

पुणे, सोलापूरमध्ये शनिवारपासून जोरदार पाऊस पडत असून पावसाच्या हाहाकाराने पुणे-सोलापूर महामार्गावरील एक इनोवा वाहून गेली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलढाणा जिल्ह्यात रिमझिम पावसानंतर आता चांगलाच जोर पकडला आहे. बुलढाणा, खामगाव, नांदुरा व चिखली तालुक्यात दुपारपासून पावसाने धुव्वाधार बॅटिंग सुरू केली आहे. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जनावरांसाठी साठवलेला चारा आणि खाद्य भिजून खराब झाले आहे, तर गोठा कोसळल्याने काही जनावरे जखमी झाली आहेत.

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चंद्रभागेची पाणीपातळी तब्बल एक मीटरने वाढली आहे. यामुळे पंढरपूरला २५ जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा बंधाऱ्यात जमा झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरात बॅटिंग सुरू असून उजनी धरणात, तर चार टीएमसी एवढे पाणी जमा झाले आहे. सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत, तर कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेने भरल्याने तो ओव्हरफ्लो वाहू लागला आहे.

सिन्नरमध्ये बसस्थानकाचा भाग कोसळला

नाशिक जिल्ह्याला मान्सूनचा जोरदार फटका बसला. नाशिक ग्रामीणमध्येही दमदार पाऊस बरसत असून नद्या-नाल्यांना पूर आल्याचे चित्र आहे. त्यातच सिन्नरच्या हायटेक अशा बसस्थानकातील काही भाग कोसळला आहे. बसस्थानक रिकामा करण्यात आला असून शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

तीन दिवसांत मुंबईत एंट्री

पुढील तीन दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात, कर्नाटकसह बंगळुरू, आंध्र प्रदेशचा काही भाग, तमिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागांत आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांत पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत मुंबईतही मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

यंदाच्या वर्षी राज्यात आणि देशभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा देशात १०७ टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातही समाधानकारक आणि भरघोस पावसाची शक्यता असल्याने कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळू शकतो.

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार

दरम्यान, अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे, तर मुंबई आणि ठाण्याला पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. अलिबागमधील अनेक समुद्रकिनारे रविवार असूनही ओस पडले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in