

पुणे : दुष्काळाची दाहकता वाढत असतानाच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतली. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून दक्षिणेकडील काही राज्यांसह पूर्वोत्तर भारतातूनही परतण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मान्सूनच्या परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू झाला असून, आतापर्यंत देशाच्या निम्म्याहून अधिक भागातून मान्सून माघारी फिरला आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून मान्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर गुरुवारी संपूर्ण राज्यातून मान्सून बाहेर पडला. सध्या उत्तर गोव्याचा काही भाग आणि उत्तर कर्नाटकापर्यंत मान्सूनची माघार झाली असून, पणजी, विजयपूर आणि बेळगाव अशी त्याची रेषा असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
यंदा महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पावसाची तूट राहिल्याने दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील धरणसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.
काही भागांत पाण्याच्या उपशावर निर्बंध घालण्यात आले असून, त्यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. पाणीटंचाईचा परिणाम शेती आणि उद्योगांच्या नियोजनावर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महागाईचा परिणामही जाणवत असून, डाळींच्या दरात वाढ सुरू झाली आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून दक्षिणेकडील काही राज्यांसह पूर्वोत्तर भारतातूनही माघार घेण्याची शक्यता आहे.
कोकण-गोव्यात उष्ण, दमट हवामान
पुढील दोन दिवस कोकण आणि गोव्याच्या काही भागांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. या भागातील कमाल तापमान वाढले असून, काही ठिकाणी पारा ३५ अंशांच्या पुढे गेला आहे.
ऑक्टोबरच्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, राज्यभर प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.