एकमत होईना, वंचितचेही ठरेना; महाविकास आघाडीत जागावाटपाचा घोळ!

राज्यातील महायुतीला सक्षम पर्याय म्हणून महाविकास आघाडी मजबूत स्थितीत पुढे येत आहे. परंतु, त्यांच्या जागावाटपाचा घोळ अद्याप संपलेला नाही.
एकमत होईना, वंचितचेही ठरेना; महाविकास आघाडीत जागावाटपाचा घोळ!

राजा माने/मुंबई

राज्यातील महायुतीला सक्षम पर्याय म्हणून महाविकास आघाडी मजबूत स्थितीत पुढे येत आहे. परंतु, त्यांच्या जागावाटपाचा घोळ अद्याप संपलेला नाही. एक तर प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातच अजूनही काही जागांवरून रस्सीखेच सुरूच आहे. त्यात वंचित विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हेही महाविकास आघाडीत तडजोडीच्या भूमिकेऐवजी खेचाखेचीत आघाडीवर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत अजूनही घोळ कायम असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या बैठकीतही फक्त चर्चेचे गुऱ्हाळच पाहायला मिळाले.

महाविकास आघाडीत कुठल्याही प्रकारचे मतभेद चव्हाट्यावर न आणता समितीच्या माध्यमातून जागावाटपाचा संवाद सुरू आहे. तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते एकत्रित बसून जागावाटपावर चर्चा करीत आहेत. राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ पैकी ४० जागांवर एकमत झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु, केवळ ८ जागांवर एकमत होत नसल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यातच शुक्रवारी वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रथमच महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले. यापुढील बैठकीत जागावाटपावर चर्चा होईल, असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आगामी बैठकांत सकारात्मक पाऊल दिसेल, असे बोलले जात आहे. परंतु अद्याप तरी जागावाटपाचा घोळ मिटलेला नाही.

दरम्यान, अ‍ॅड. आंबेडकर रोखठोक बोलण्यात आघाडीवर आहेत. शुक्रवारी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडी संपल्याचे वक्तव्य केले. विशेष म्हणजे त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह आघाडीतील सर्वच नेते उपस्थित होते. त्याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीचे असे होऊ देणार नाही, असे म्हटल्याने अ‍ॅड. आंबेडकर महाविकास आघाडीबाबत अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या अगोदरच त्यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्याशी संवाद साधावा आणि ऑफर द्यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. शुक्रवारच्या बैठकीत यावरही चर्चा झाली असावी, असे बोलले जात आहे. मात्र, महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच असून, अजूनही जागांचा घोळ मिटलेला नाही, असेच चित्र आहे. मात्र, महाविकास आघाडी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर कसून प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पूर्व विदर्भातील अधिकाधिक जागांवर काँग्रेस नेते आग्रही असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: रामटेक हा शिवसेनेचा गड मानला जातो. परंतु तिथे काँग्रेसने दावा केल्याचे समजते. यासोबतच भंडारा-गोंदियावरदेखील काँग्रेसनेच दावा केला आहे. याशिवाय गडचिरोली, नागपूर, चंद्रपूरमध्येही काँग्रेसच प्रबळ आहे. त्यामुळे या जागा तर काँग्रेसकडे आहेतच. मात्र, पूर्व विदर्भात राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाला प्रत्येकी एका जागेवर पाणी सोडावे लागू शकते. त्या बदल्यात अन्य जागा घेण्यावर भर राहील.

वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. परंतु यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भंडारा-गोंदियाच्या बदल्यात हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळू शकतो. दुसरीकडे काँग्रेस यवतमाळ आणि बुलडाणा काँग्रेसला हवा आहे. परंतु हे दोन्ही मतदारसंघ ठाकरे गट सोडायला तयार नाहीत. मात्र, अमरावती काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.

तिढा कायम

महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षात अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घ्याव्यात, यासाठी प्रयत्न आहेत. त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्याने त्यांचे बळ कमी झाले आहे. त्यामुळे त्यांना काही जागांवर तडजोड स्वीकारावी लागण्याची शक्यता आहे. मात्र, जिथे उमेदवार सक्षम, तेथील जागा संबंधित पक्षाला सोडण्यावर एकमत आहे. त्यामुळे या सूत्रानुसार तिढा सुटण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in