महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांचा एका बिअर बारमधील व्हिडीओ महाराष्ट्र कॉँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामुळे राज्याच्या प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आहे. हा व्हिडिओ नागपूरच्या मनीषनगर येथील बिअर बारमधील आहे. बारमध्ये तिघेजण दारूच्या घोटांसोबत सरकारी फायलींवर काम करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. या प्रकरणावरून काँग्रेसने महाराष्ट्र शासनावर जोरदार निशाणा साधला आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
या व्हिडीओमध्ये तीन व्यक्ती बिअर बारमधील टेबलावर महाराष्ट्र शासनाच्या शासकीय फायली ठेवून त्यावर चर्चा करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यातील एक अधिकारी दारू पीत असतानाच कागदपत्रांवर सह्याही करताना दिसतोय.
पाहा व्हिडिओ -
महाराष्ट्र शासनाचे अधिकारी बिअर बारच्या दारी
काँग्रेसने या घटनेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अधिकृत 'X' हँडलवर लिहिले, ''महाराष्ट्र शासनाच्या फाईल’ म्हणजे राज्यातील जनतेसाठी मंत्रीमहोदयांकडून घेतले जाणारे महत्वाचे निर्णय. जनतेचे भविष्य आणि राज्याच्या विकासाचे धोरण या फाईल्समधून स्पष्ट होत असते. बिअर बार सारख्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या फाईल दिसणे आणि त्यावर अधिकारी स्वाक्षरी करताना दिसणे, यासारखा लाजिरवाणा प्रकार अजून काय असू शकतो? फडणवीस सरकारच्या काळात अशा गोष्टी सर्रास होत आहेत कारण कोणालाच धाक उरलेला नाही. मंत्र्यांच्या माजुर्ड्यापणाची जनतेला सवय झाली, पण आता अधिकारीही त्याच वाटेवर आहेत. हे पाहून या सरकारची आणि अधिकाऱ्यांची कीव यायला लागली आहे.''
सरकारचा कुणालाच धाक उरलेला नाही - विजय वडेट्टीवार
तर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले, ''पैसा आणि नशा एवढंच काम आता काही सरकारी बाबूंना उरलंय का? ना जबाबदारी, ना भीती "वरून दारूचा घोट, टेबलाखालून पैशाची नोट" ?, यांचं लोकसेवेचं भान हरवत चाललंय. सरकारचा कुणालाच धाक उरलेला नाही, जनतेचं सरकारला काही पडलं नाही. सरकार आणि अधिकारी यांचं मात्र सगळं ‘आनंदी-आनंद’ चाललंय.''
या व्हिडिओवर नागरिकांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या या प्रकरणात अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, काँग्रेसच्या आरोपांमुळे हे प्रकरण राजकीय व प्रशासनिक वादळात सापडलं आहे. संबंधित अधिकारी कोण होते, त्यांनी कोणत्या विभागाच्या फाईल्सवर सह्या केल्या आणि त्या फाईल्स महत्त्वाच्या होत्या का, याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.