

महायुतीतील नाराजीनाट्य वाढत असल्याचे दिसत आहे. फोडाफोडीच्या राजकारणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिंदे गटाने बहिष्कार टाकला. त्यामुळे सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा रंगली आहे. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे समजते. यावरून आता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. "कुणीतरी दिल्लीला गेलं होतं, बाबा मला मारलं म्हणून" असा खोचक टोलाही लगावला आहे.
आज वांद्रे पूर्व येथे एम.आय.जी. क्लबमध्ये मुंबईतील विविध शाळांकरिता ‘डिजीटल स्मार्ट बोर्ड’ वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले,"आता सरकारमध्येच एकमेकांच्या नसा आवळल्या जात आहेत. आजच आपण वाचलं, कुणीतरी दिल्लीला गेलं होतं. 'बाबा मला मारलं' म्हणून. लाचारी का? जर त्यांना चांगला शिक्षक मिळाला असता तर ही परिस्थिती आली नसती."
"आयुष्यात चांगला शिक्षक आणि चांगलं शिक्षण मिळालं नाही तर काय होतं? दिवटी म्हणजे मशाल असते आणि दिवटा म्हणजे? असे काही दिवटे आहेत ज्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही. मराठी भाषेची ही गंमत आहे. शिक्षक मतदारसंघातून आपला लोकप्रतिनिधी कुठलाही वाह्यातपणा न करता शिक्षक म्हणून आपल्या कामात वेगळा ठसा उमटवत असतो," असे उद्धव ठाकरे या कार्यक्रमात म्हणाले.