पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता

महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेनंतर आता पुढील पाच दिवस मुंबई आणि महानगर प्रदेशासह संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे.
पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता
पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता
Published on

मुंबई : महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेनंतर आता पुढील पाच दिवस मुंबई आणि महानगर प्रदेशासह संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे. पुणे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर आणि मराठवाडा यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणारे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हवामानातील हा बदल लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना ३० मार्च ते ४ एप्रिल या काळात काढणीला आलेली पिके वादळ, गारपीट आणि वाऱ्यापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कृषी विभागाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ३० मार्चला प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांत काही ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही हवामानात बदल जाणवेल. ३१ मार्चला पावसाचा जोर काहीसा कमी होईल; मात्र, हवामान अस्थिर राहील. त्यानंतर १ ते ४ एप्रिल दरम्यान पावसाची तीव्रता पुन्हा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शेतीच्या कामाचे नियोजन करा

रब्बी पिकांची काढणी सध्या अंतिम टप्प्यात असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन कृषी कामांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावा. वादळी वारे आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी वादळाच्या वेळी स्वतःसह पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडांखाली, पत्र्याच्या शेडखाली, इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब किंवा वीजवाहिन्यांजवळ उभे राहणे टाळावे.

मुंबईत दोन दिवस ढगाळ वातावरण

रविवारी मुंबईतील कुलाबा वेधशाळेत कमाल ३२.४ आणि किमान २५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे. पुढील ४८ तासांत मुंबई आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत तापमानात मोठा बदल होणार नसला तरी त्यानंतर पारा घसरण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in