Iran vs Israel-US War : मध्यपूर्वेतील युद्धाचा महाराष्ट्राला फटका; विमानसेवा ठप्प, २०० पेक्षा जास्त प्रवासी दुबईत अडकले

पुणे, ठाणे, सांगली, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यांतील नागरिक पर्यटन, कार्यक्रम किंवा शिक्षणासाठी दुबईला गेले होते. अचानक उड्डाणे रद्द झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Iran vs Israel-US War : मध्यपूर्वेतील युद्धाचा महाराष्ट्राला फटका; विमानसेवा ठप्प, २०० पेक्षा जास्त प्रवासी दुबईत अडकले
Published on

इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाचा परिणाम आता जागतिक हवाई वाहतुकीवर दिसू लागला आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे दुबईसह गल्फ प्रदेशात महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक आणि विद्यार्थी अडकले आहेत.

माहितीनुसार, इराणकडून यूएईसह काही गल्फ देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाल्यानंतर सुरक्षा कारणास्तव दुबई, अबूधाबी आणि शारजाह येथील प्रमुख विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द झाली असून प्रवासी हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत.

जिल्हानिहाय अडकलेले प्रवासी

पुणे, ठाणे, सांगली, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यांतील नागरिक पर्यटन, कार्यक्रम किंवा शिक्षणासाठी दुबईला गेले होते. अचानक उड्डाणे रद्द झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Iran vs Israel-US War : मध्यपूर्वेतील युद्धाचा महाराष्ट्राला फटका; विमानसेवा ठप्प, २०० पेक्षा जास्त प्रवासी दुबईत अडकले
कुवैतमध्ये अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ल्याचा दावा; F-15 फायटर जेट कोसळले, Video

पुण्यातील १० पर्यटक व इंदिरा स्कूलचे ८४ एमबीए विद्यार्थी, ठाण्यातील ४८ पर्यटक, पिंपरी-चिंचवड येथील ४० ज्येष्ठ नागरिक, जळगावमधील ३१ नागरिक, सांगली (कुपवाड) येथील ३० पर्यटक, अहिल्यानगरमधील १२ पर्यटक तर लातूर, वाशिम, परभणी येथील काही प्रवासी असे एकूण सुमारे २५५ पर्यटक आणि विद्यार्थी सध्या दुबईत अडकले आहेत.

गिरीकंद ट्रॅव्हल्सचे ५० पर्यटक अडकले

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील गिरीकंद ट्रॅव्हल्स या संस्थेच्या सुमारे ५० पर्यटक दुबईत अडकले आहेत. हे प्रवासी पुणे, अहिल्यानगर, ठाणे आणि सांगली येथील आहेत. संस्थेचे विभागप्रमुख विनायक वाघचौरे यांनी सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांची हॉटेलमध्ये व्यवस्था केल्याचे सांगितले. "परिस्थिती सामान्य होताच त्यांना भारतात परत आणले जाईल. आम्ही राज्य सरकारशी सतत संपर्कात आहोत," असे त्यांनी सांगितले.

मुंबई विमानतळावरून १२५ उड्डाणे रद्द

इराणच्या हल्ल्यांनंतर अनेक देशांनी खबरदारी म्हणून आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. परिणामी मुंबई-लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरोंटो आणि पॅरिस या मार्गांवरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह अनेक सेवा रविवारी आणि सोमवारी रद्द करण्यात आल्या.

मुंबई विमानतळावरून तब्बल १२५ उड्डाणे रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. मर्यादित उपलब्ध उड्डाणांमुळे विमानभाडे ₹१.५ लाखांपर्यंत वाढल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे यांचा अडकलेल्या नागरिकांशी संवाद

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुबईत अडकलेल्या नागरिकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

"तुम्ही सगळे सुरक्षित आहात ना?" असा प्रश्न विचारत त्यांनी संवादाची सुरुवात केली. त्यावर नागरिकांनी सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगितले. परिस्थिती सामान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे यांनी राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत असल्याचे आश्वासन दिले. "काळजी करू नका, तुमच्या राहण्याची आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था केली जाईल," असे त्यांनी सांगितले.

उड्डाणे रद्द होण्याची शक्यता

तथापि, मध्यपूर्वेतील तणाव कायम राहिल्यास आणखी उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. अडकलेल्या प्रवाशांच्या सुरक्षित परतीसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in