

मुंबई : विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षात अधिकृत उमेदवारीवरून गोंधळ होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पुण्याच्या उमेदवारीवरून संभ्रम असून येथे दोन जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. अहिल्यानगर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
नांदेड, रायगडमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तर यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जून ही असून त्यानंतरच विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
काकडेंच्या चिरंजीवाना उमेदवारी
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. यापैकी पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उद्योजक संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम यांनी तसेच माजी आमदार सुनील टिंगरे यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण? यावर अजित पवार गटात गोंधळ उडाल्याचे दिसून आले. अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात भाजपच्या प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राणी लंके, काँग्रेसच्या करण ससाणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मछिंद्र धुमाळ यांनी अर्ज भरले आहेत.
बंडखोरीचीही लागण
प्रदेश काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार नांदेड मतदारसंघातून रामदास पाटील -सुखटणकर हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याचवेळी माजी आमदार माधवराव पाटील -जळगावकर यांचा यादीत अपक्ष म्हणून उल्लेख आहे. नांदेडमध्ये भाजपकडून अमर राजूरकर यांनी अर्ज भरला असून येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील -चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण आणि हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील-अष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा यांनी बंडखोरी केली आहे. तर रायगड मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल करत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनिकेत तटकरे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे.
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील उमेदवार
शिवसेना-शिंदे गट - ठाणे : रवींद्र फाटक, नाशिक : नरेंद्र दराडे, यवतमाळ : दुष्यन्त चतुर्वेदी, परभणी-हिंगोली : सईद खान
राष्टवादी (अजित पवार) - रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, पुणे : विक्रम काकडे किंवा सुनील टिंगरे
शिवसेना ठाकरे गट - नाशिक : अनिल कदम, परभणी-हिंगोली : डॉ. विवेक नावंदर, छत्रपती संभाजीनगर-जालना : देवयानी कृष्णा पाटील-डोणगावकर जळगाव : शरद तायडे, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग : सुरेंद्र उर्फ बाळ माने
राष्ट्रवादी शरद पवार गट - पुणे : श्रीकांत पाटील, ठाणे : अभिजित पवार, सांगली-सातारा : बाळासाहेब उर्फ बापू पाटील