Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. मात्र अद्याप महायुती असो वा महाविकास आघाडी दोघांकडूनही जागावाटप व उमेदवारांची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. मात्र अद्याप महायुती असो वा महाविकास आघाडी दोघांकडूनही जागावाटप व उमेदवारांची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे सेटिंग लावली आहे. एवढे करूनही उमेदवारी मिळाली नाही, तर बंड करण्याची तयारीही अनेक उमेदवारांनी केली आहे. ज्यामुळे पक्षांतर्गत बंडाळीचा धोका ओळखून मविआ व महायुती या दोघांनीही उमेदवारी जाहीर करण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे.

त्यामुळे हमखास निवडून येणारे उमेदवार सोडले, तर अन्य उमेदवारांच्या नावांची घोषणा टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचे महायुती व मविआकडून सांगण्यात आले. विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होतील याचे संकेत आधीपासून मिळत होते. त्या पार्श्वभूमीवर महायुती, मविआ, तिसरी आघाडी आदींनी निवडणुकीसंदर्भात मोर्चेबांधणी सुरू केली होती. महायुती असो वा महाविकास आघाडी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत दोन महिन्यांपासून चर्चा सुरू होती. मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यामुळे राजकीय पक्षांकडे प्रचारासाठी तसा कालावधी कमी उरला आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवारांवर दोन्ही पक्षांनी फोकस केले आहे.

विधानसभा निवडणूक ही महायुती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. दोन्ही आघाड्यांकडून त्यामुळे सावध भूमिका घेतली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घटिका समीप आली असताना उमेदवारांची नावे जाहीर केली तर नाराज उमेदवारांकडून दगाफटका, बंडाळीचा धोका लक्षात घेता उमेदवारांची यादी जाहीर करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असे महायुतीतील वरिष्ठ नेत्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in