मुंबई/नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याच मुद्द्यावरून भाजपला चांगलेच धारेवर धरले. केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत केलेल्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी गुरुवारी नागपूर येथील संविधान चौक ते विधान भवनापर्यंत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आंदोलन केले.
नागपूरमधील संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून व अभिवादन करून मविआच्या आमदारांनी आक्रमकपणे आंदोलनाला सुरुवात केली. हातात बाबासाहेबांचे फोटो घेत घोषणा देत सर्व आमदारांनी संविधान चौकापासून पायी विधानभवनात प्रवेश केला. यावेळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर येत “बाबासाहेब का है अपमान, नही सहेगा हिंदुस्थान”, “जय भीम, जय भीम’च्या जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी यावेळी दिल्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान मंगळवारी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून नवा वाद उफाळून आला आहे. काँग्रेसने या वक्तव्यावर आक्षेप घेतला असून अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
भाजपकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला आहे. हा त्यांचाच नव्हे तर संविधान आणि नागरिकांचा अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य देशाच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. बाबासाहेबांनी सर्व समाज घटकातील लोकांना न्याय दिला. जसे आम्हाला वाटते अपमान झालाय तसे नितीश कुमार, रामदास आठवले आणि सत्तेतील मित्रपक्षांना वाटत नाही का? वाटत असेल तर त्यांनी आंदोलन केले पाहिजे, रस्त्यावर उतरले पाहिजे. भाजपच्या मनातले ओठावर आलेय.
- आदित्य ठाकरे, आमदार, ठाकरेंची शिवसेना