मुंबई : सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त आठ महिन्यांत कोसळला. प्रत्येक कामात भ्रष्टाचार करणाऱ्या महायुती सरकारने महाराजांच्या पुतळ्यात तर भ्रष्टाचाराचा कळस गाठला. मोदी-शहांचे दलाल रस्ते अडवून बसलेत. त्यामुळे महायुतीच्या भ्रष्टाचाराची चिरफाड करण्यासाठी रविवार, १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे महाराजांच्या स्मारकाला वंदन करून महायुतीविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्यावतीने हे आंदोलन करण्यात येत असून राज्यातील शिवप्रेमींनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवप्रेमींना केले.
दरम्यान, महाविकास आघाडी-च्यावतीने ‘मातोश्री’ निवासस्थानी राज्यातील विविध विषयांवर बैठक पार पडली. या बैठकीनंतर मविआच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. ‘डिसेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले आणि आठ महिन्यांत पुतळा कोसळतो, याचा अर्थ पुतळ्याच्या कामात किती भ्रष्टाचार केलाय, याची चौकशी झालीच पाहिजे. महाराजांचा पुतळा कोसळला आणि आता नवीन पुतळा बसवण्याची बाता करत आहेत. नवीन पुतळा बसविण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवणार आणि त्यात पुन्हा घोटाळा करणार,” असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी महायुतीला लगावला.
कोश्यारींची खिल्ली उडविली
तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी समुद्रकिनारी राहत होते. मात्र जोरदार वारा आला आणि त्यांची टोपी उडाली, हे कधीच वाचनात आले नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी कोश्यारींची खिल्ली उडविली.
केसरकर गद्दारच!
महाराजांचा पुतळा कोसळला, काही तरी शुभ घडणार, असे विधान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. केसरकर हे गद्दारच आहेत, त्यामुळे ते अशा भाषेचा वापर करतात, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांची कानउघाडणी केली.
२ सप्टेंबरपासून राज्यभर ‘जोडे मारो’ आंदोलन - पटोले
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा कोसळण्याची घटना महायुतीच्या भ्रष्ट कारभाराचा नमुना आहे. पुतळा कोसळून महाराजांचा घोर अपमान करणाऱ्या महायुती सरकारविरोधात महाविकास आघाडी रविवारी, १ सप्टेंबर रोजी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन करणार आहे. तर २ सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुक्यातही हे आंदोलन करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
“राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. रश्मी शुक्ला यांना कोणत्या आधारावर पोलीस महासंचालकपदाचा कार्यकाळ वाढवून दिला आहे. या पोलीस महासंचालक भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वसंयेवक संघाचा अजेंडा चालवत आहेत. राज्य सरकारची चुकीची धोरणे व पोलीस प्रशासनाच्या कारभारामुळेच राज्यातील परिस्थिती बिघडली आहे,” असेही नाना पटोले म्हणाले.