रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची शुक्रवारी (दि.२६) हत्या करण्यात आली. "जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती देऊनही स्थानिक पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही," असा गंभीर आरोप मंगेश काळोखेंच्या नातेवाईकांनी केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, मंगेश काळोखे हे आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेले होते. मुलांना शाळेत सोडून परत येत असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. रस्त्यात त्यांना अडवून खाली पाडले. खाली पडल्यानंतर दोन-तीन जणांनी त्यांना घेरले आणि त्यानंतर पाच ते सहा जणांनी त्यांना बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात हल्लेखोरांनी दगड, तलवारी आणि कोयत्यांचा वापर करत मंगेश काळोखे यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर २४ ते २५ वार केले. हा हल्ला इतका क्रूर होता की मंगेश काळोखे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हत्येपूर्वी दिली होती जीवे मारण्याची धमकी
मृत मंगेश काळोखे यांनी २५ डिसेंबर रोजी खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन हिरे यांना देवकर समर्थकांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती दिली होती, असा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र या तक्रारीनंतरही स्थानिक पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आली नाही. तसेच, नॉन-कॉग्निझेबल गुन्ह्याची नोंदसुद्धा केली नाही, असा आरोप करण्यात येत आहे.
९ आरोपी पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, या हत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी मोठी कारवाई केली. एकूण ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मानसी काळोखे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) राजकीय प्रतिस्पर्धी उर्मिला देवकर यांचा समावेश आहे. उर्मिला देवकर या खोपोली नगरपरिषद निवडणुकीत मानसी काळोखे यांच्याविरोधात उमेदवार होत्या, मात्र त्या ७०० मतांनी पराभूत झाल्या होत्या.
देवकर कुटुंबाला अटक
उर्मिला देवकर यांच्यासह त्यांचे पती रवींद्र देवकर, मुलगे धनश देवकर आणि दर्शन देवकर यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या कथित हत्याकांडात देवकर यांचे समर्थक विशाल देशमुख, दिलीप पवार, महेश ढैठाडक आणि सागर मोरे यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे.
२६ तासांच्या शोध मोहिमेनंतर आरोपी सापडले
रायगड पोलिसांनी सुरुवातीला रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर यांना अटक केली. शुक्रवारी सकाळी मंगेश काळोखे यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या कटामागील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह आठ पोलिस पथके तैनात करण्यात आली होती. तब्बल २६ तासांच्या शोध मोहिमेनंतर नागोठणे परिसरात आरोपींचे ठिकाण शोधून त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.