मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. असंख्य मराठे या आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत दाखल होत आहेत. राज ठाकरे यांनी शनिवारी (दि. ३०) मनोज जरांगे परत का आले? हा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा असे म्हटले होते. यावर आता मनोज जरांगे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?
मनोज जरांगे म्हणाले, समाजाचं, राज्याचं म्हणण आहे की दोन्ही भाऊ चांगले आहेत. ब्रँड चांगलं आहे. पण, हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नांमध्ये पडतोय. त्याला आम्ही कधी विचारलं का ११ ते १३ आमदार निवडून दिले आणि ते का पळून गेले? तू आमच्या मराठवाड्यात कव्हा आला? आम्ही तुला विचारलं का तू काल पुण्यात कव्हा आला? तुला विचारलं का तुझी नाशिकची सासरवाडी, तू ५० वेळा नाशिकला का येतो? आम्ही विचारलं का? एक लोकसभेला फडणवीसने तुझा गेम केला. त्यानंतर विधानसभेला तुझं पोरगं त्याने पाडलं. तरी तू त्याची री ओढतो. हे राज ठाकरे म्हणजे असं आहे मानाला भुकालेलं पोरगं आहे. त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला म्हणजे त्याला सगळा पक्ष बरबाद झाला तरी चालतं. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचं म्हणतात'' अशी राज ठाकरे यांच्यावर जरांगे यांनी घणाघाती टीका केली.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
ठाणे येथील मनसे पदाधिकारी मेळाव्यानंतर शनिवारी (दि. ३०) राज ठाकरे यांना आंदोलनाबाबत माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, "आरक्षणाबाबत माझी भूमिका सर्वांना माहिती आहे, ते आता पुन्हा सांगण्यासारखं काही नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीवर केवळ एकनाथ शिंदेच बोलू शकतात. मुंबईतील वाहतूक कोंडी, तुम्ही म्हणताय तसा लोकांना त्रास होतोय वगैरे गोष्टींवर शिंदेच बोलू शकतात. कारण मागच्या वेळेस एकनाथ शिंदे नवी मुंबईला जाऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवून आले होते ना? मग जरांगे परत का आले? या सर्व गोष्टींची उत्तरं केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात," असे त्यांनी म्हटले होते.