असंख्य मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांत बैठका होऊनही शासन तोडगा काढत नसल्याने मनोज जरांगे यांनी उद्यापासून पाणीही न पिता आमरण उपोषण करणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. यासोबतच त्यांनी मराठ्यांना गर्दी न समजता त्यांच्या वेदना समजून घ्या अशी प्रतिक्रिया दिली. तर, मराठा आंदोलकांना नाव खराब होईल असे वर्तन न करता शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. मात्र, सरकारला निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशाराही दिला.
तर, १००-२०० किमीच्या रांगा लागतील, मनोज जरांगेंचा इशारा
राज्य सरकारणे नेमून दिलेली उपसमिती मराठा आरक्षणावर तोडगा काढत नसल्याने पत्रकार परिषदेत मनोज जरांगे म्हणाले, ''काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली. तातडीने आदेश काढा असे त्यांनी सांगितले, तर उपसमिती मार्ग का काढत नाही? तुम्हाला काय करायचं ते करा ओबीसीमध्ये मराठा आहे. ओबीसीतून आरक्षण पाहिजे. त्याशिवाय मी, मराठे मुंबई सोडत नसतात. यापुढे सांगतो तुम्हाला शनिवारी-रविवारी मराठा घरी नसणार. हा दिवस उगवू देऊ नका. कारण मी एकदा इथून सांगितलं, की शनिवारी या, रविवारी या तर तुम्हाला सांगतो. मुंबई तर सोडाच महाराष्ट्रातून येतील. तुम्हाला इथून १००-२०० किमी मागे उभं राहावं लागेल. १००-२०० किमीच्या रांगा लागतील आणि आपण जे बोलतो ते करून दाखवतो.''
राज्यसरकारने आंदोलनाला गर्दी समजू नये
जरांगे यांनी स्पष्ट केले, की ''शेवटी ६०-७०-८० वर्षांपासून या समाजाला ओबीसी मधून आरक्षण असूनही दिलं गेलं नाही. म्हणून ही प्रचंड मोठी वेदना आहे. याला राज्यसरकारने गर्दी समजू नये. तर, याला वेदना समजावं. गोरगरीब लेकरांचं वाटोळं होत आहे. म्हणून या गरीब मराठ्यांचे लोकं मुंबईत आलेत. गरीब सामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जाती धर्माचे लोकं आमच्या गरीब मराठ्यांचे सेवा करत आहेत. गोरगरिबांच्या आयुष्याच्या लेकराचा प्रश्न आहे. त्याला गर्दी समजू नका.''
पुढे त्यांनी मराठा आंदोलकांच्या गाड्या पार्किंग समस्येवर तोडगा काढत सांगितले, ''इथे दोन हजार थांबा म्हंटलेत म्हणून हे इकडे आहेत. बाकीचे तिकडेच थांबणार. माझी राज्यातील गरीब मराठ्यांना विनंती आहे. येताना मुंबईत ग्राऊंडला सुरक्षित पार्किंगमध्ये गाड्या पार्क करा. मग रेल्वेने आझाद मैदानावर या. ही सोपी प्रक्रिया आहे. तुम्हाला वाटत असेल आपली गाडी असून रेल्वेने कसं काय? गाडी सुरक्षित राहते, तुम्ही सुरक्षित राहताय. मी सांगतो तुम्ही एवढं लक्षात ठेवा.''
अन्नछत्राच्या नावाखाली पैसे घेणाऱ्यांना सज्जड दम
अन्न वाटपच्या नावाखाली पैसे मागण्याचे प्रकार समोर आल्याचे समजताच जरांगे म्हणाले, ''महाराष्ट्रात विशेष लोकांनी अन्नछत्र सुरू केले आहे. ते एक एक लोकाने सुरू केलं आहे. त्याच्या जीवावर कोणी पैसे उकळवू नका. मी मिडियात नाव घेईन. अन्नछत्र एकाने सुरू केलं, पैसे मागतोय तिसरा. असला नालायकपणा करून गरिबांचं रक्त प्यायचं बंद करा तुम्ही.''
त्यांनी जवळच्या सहकाऱ्याला इशारा देत म्हटले, ''मी नाव घेईन, जवळचा असो लांबचा असो. तुम्ही माझ्यासोबत गाडी घेऊन पळताय. म्हणून का मी पैसे जमा नाही करू शकत? तू आता सांग डिझेलचे किती पैसे झाले? मी आता गोळा करून देतो. मी कोणाला बोलतोय हे कळतंय. कारण त्याने लोकसभेतही पैसे खाल्लेत. आता पण रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करत आहे. रेनकोट एका माणसाने वाटले आहेत. मला इथं रेनकोट वाटायचे म्हणून लोकांकडून पैसे जमा करतोय. भिकार धंदे बंद कर. तुझी माझ्या नजरेत इज्जत आहे. लोकसभेत पण तू कोणाकडून पैसे घेतलेत. कोणी दिलेत ते पुराव्यासहित मांडेन. माझं नाव तुमच्यामुळे खराब होतं. महाराष्ट्रातील मराठ्याला सांगतो आता एक रुपयासुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असले तर आज रात्रीत तुमचे पैसे माघारी मागा.''
मराठा आंदोलकांना जरांगेंचे आवाहन
जरांगे यांनी आंदोलकांना कोणतीही वाईट कृती करू नका सांगत आवाहन केले, की ''मराठा समाजाच्या एकाही पोराने दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. समाजाला खाली मान घालावी लागेल असं काही करायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं. त्यांनी कितीही आपल्यावर अन्याय करुद्या, अत्याचार करुद्या मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. काहीही करून तुम्हाला आरक्षण देणार. त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हा शब्द आहे माझा.''