मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. अनेक ठिकाणी पिके, माती आणि जनावरांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत.
मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार
Published on

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. अनेक ठिकाणी पिके, माती आणि जनावरांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. या संकटाच्या काळात शासनासह समाजातील विविध घटक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळानेही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तर, पारलिंगी समुदायाने चक्क जोगवा मागून निधी उभारला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने २,२१५ कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. पुढील काही दिवसांत ही मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असेही त्यांनी आश्वासन दिले आहे. याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधीमधून अतिरिक्त मदतीची तरतूद केली जात आहे.

लालबागचा राजा मंडळाचा पुढाकार

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेत नेहमीच सामाजिक भान जाणवते. त्याचा प्रत्यय यंदाही आला आहे. मुंबईतील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शेतकऱ्यांसाठी तब्बल ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. हा धनादेश थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला जाणार असून लवकरच यासाठी मुख्यमंत्री यांची वेळ घेण्यात येणार आहे.

पारलिंगी समुदायाचा आदर्श उपक्रम

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पारलिंगी समुदायाने गुरुवारी (दि. २५) जोगवा मागून जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिली. तहसील कार्यालयात जाऊन निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीत चलन भरून ही रोख रक्कम जमा करण्यात आली.

सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचा हातभार

राज्यातील सर्व विद्यमान आमदार आणि खासदार यांनी आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार या मदतीसाठी देणार आहेत. राज्यातील सर्व शिक्षकवर्ग देखील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन देणार आहेत. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या दुःखात शिक्षकवर्ग खंबीरपणे उभा आहे.

logo
marathi.freepressjournal.in