मराठवाड्यात पावसाचा हाहाकार; बीड, सिल्लोडमध्ये नागरिक अडकले, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य सुरू | Video

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार; बीड, सिल्लोडमध्ये नागरिक अडकले, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य सुरू | Video

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली. बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सर्वाधिक फटका बसला असून, मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
Published on

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली. बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सर्वाधिक फटका बसला असून, मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांनी बचाव मोहिमेत मोठी भूमिका बजावली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडकलेल्या नागरिकांना एअरलिफ्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

एअरलिफ्टने नागरिकांची सुखरूप सुटका

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात तब्बल ४४ नागरिक तर सिल्लोड तालुक्यातील मौजे देऊळगाव बाजार येथे ५ जण पूराच्या पाण्यात अडकले. लष्कर, NDRF पथक तसेच हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. कडा शहरात हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलेल्या बचाव मोहिमेत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

पूरग्रस्त गावांमध्ये कडा, सोभा निमगाव, घाटा पिंपरी, पिंपरीखेड आणि धानोरा या गावांचा समावेश आहे. नाशिकहून हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली असून, जिल्हा प्रशासन, सेना आणि एनडीआरएफ यांच्या संयुक्त मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक ३७ मिमी पाऊस नोंदवला गेला. त्यानंतर धाराशिव (२८ मिमी), परभणी (२५ मिमी), लातूर (२४ मिमी), हिंगोली (१४ मिमी), नांदेड (१२ मिमी), छत्रपती संभाजीनगर (५ मिमी) आणि जालना (३ मिमी) या जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली.

बीडमधील अंबाजोगाई तालुक्यात चिंचखंडी येथील पाझर तलावात भगदाड पडल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा प्रशासनाशी थेट समन्वय साधत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in