मराठवाड्यात शनिवारी (दि. २७) संततधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली असून गावांचा संपर्क तुटला आहे.
मुसळधार पावसाची नोंद
सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांत ठिकठिकाणी ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे तब्बल १४३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत तालुक्यांत तीन गावे पाण्याखाली गेली आहेत. वसमत तालुक्यातील चौंडी बहिरोबा तसेच कळमनुरीतील बिबथर आणि कोंढूर दिग्रस या गावांचा संपर्क तुटला आहे.
लातूर, धाराशिवमध्ये अडचणी
लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले की, रात्रीच्या पावसामुळे सखल भागातील रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही हे रस्ते आणि पूल बंद केले आहेत. मांजरा नदी क्षमतेपेक्षा जास्त वाहत असून, पाऊस सुरूच राहिला तर नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
धाराशिव जिल्ह्यातही अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. भूम आणि परांडा तालुक्यांत एनडीआरएफची पथके मदत व बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.
हवामान विभागाचा इशारा
हवामान खात्याने नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव या सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मोठ्या प्रमाणात नुकसान
२० सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून लाखो एकरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मराठवाड्याची परिस्थिती गंभीर
राज्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मराठवाड्यात एकूण ८ जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड आणि धाराशिव यांचा समावेश होतो. सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.