मराठवाड्यात फक्त २ टक्के पेरण्या; पाऊस लांबल्याचा परिणाम

नैऋत्य मोसमी पाऊस लांबल्यामुळे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये १८ जूनपर्यंत केवळ १.०७ लाख हेक्टर शेतजमिनीवर म्हणजेच २ टक्के पेरण्या होऊ शकल्या आहेत.
मराठवाड्यात फक्त २ टक्के पेरण्या; पाऊस लांबल्याचा परिणाम
मराठवाड्यात फक्त २ टक्के पेरण्या; पाऊस लांबल्याचा परिणाम'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

छत्रपती संभाजीनगर : नैऋत्य मोसमी पाऊस लांबल्यामुळे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये १८ जूनपर्यंत केवळ १.०७ लाख हेक्टर शेतजमिनीवर म्हणजेच २ टक्के पेरण्या होऊ शकल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत १०.७७ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.

मराठवाड्यात गेल्या पाच वर्षांत सरासरी जवळपास ४९.७२ लाख हेक्टर जमिनीवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षी (२०२५) १८ जूनपर्यंत १०.७७ लाख हेक्टर शेतजमिनीवर पेरणी झाली होती, तर यंदा हा आकडा अवघा १.०७ लाख हेक्टर आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या याच दिवसाच्या तुलनेत यंदा पेरणीचा आकडा अवघा २ टक्के आहे, याकडे अहवालात लक्ष वेधले आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो.

मराठवाड्यात फक्त २ टक्के पेरण्या; पाऊस लांबल्याचा परिणाम
बाष्पीभवनाने जळगावमधील धरणातील पाणीसाठ्यात घट; जिल्हावासीयांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

जिल्ह्यांचा विचार केला असता, एकूण १.०७ लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६८,५७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. इतर जिल्हे ऐतिहासिक सरासरीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या मागे आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या वर्षी याच कालावधीत १.६४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, तर यंदा अवघ्या ३,०७२ हेक्टरवर पेरणीची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांमधील (धरणे) पाणीसाठा १८ जून रोजी ६०.८४ टीएमसी होता, जो गेल्या वर्षी याच दिवशी ६७.३५ टीएमसी होता.

यंदा १८ जूनपर्यंत या भागात नेहमीच्या तुलनेत अवघा ४२.७ टक्के पाऊस झाला आहे. जूनमध्ये पावसाची सरासरी ९८.३ मिमी असते, मात्र आतापर्यंत मराठवाड्यात ४२.७ मिमी पाऊस पडला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

जिल्हानिहाय पेरणी (हेक्टरमध्ये) :

  • छत्रपती संभाजीनगर ३,०७२

  • जालना ७,२८५

  • बीड ६८,५७२

  • लातूर २३६

  • धाराशिव ६,६२२

  • नांदेड १०,८६७

  • परभणी ९,५९०

  • हिंगोली १,५०८

logo
marathi.freepressjournal.in