
मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३ हजार ६६२ सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय लॉटरी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. बुधवार, २९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता पुणे जिल्हा परिषद सभागृहात ही लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीसाठी ७१ हजार ६४२ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.
पुणे मंडळातर्फे १० ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. या लॉटरीमध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत ९३ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३ हजार ५६९ सदनिकांचा समावेश आहे. लॉटरीचा निकाल अर्जदारांना सोयीस्कररीत्या पाहता यावा याकरिता मंडळाने नियोजन केले असून सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.
अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा म्हाडाच्या @mhadaofficial या अधिकृत युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवरून करण्यात येणार आहे. थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच लॉटरीचा निकाल जाणून घेता येणार आहे. विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तत्काळ कळविली जाणार आहे.
योजनांसाठी विपणन संस्थांची नेमणूक
म्हाडा पुणे मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिवे, सासवड, पिंपरी वाघेरे, महाळुंगे इंगळे व ताथवडे फक्त याच ठिकाणी सदनिकांचे वितरण करण्यासाठी विपणन संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे घरांचे वितरण करण्यात येत आहे. तरीसुद्धा त्यांच्याशी व्यवहार करताना मिळकत व्यवस्थापक, पुणे मंडळ यांच्याकडून पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी केले आहे.