आरोप होताच मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे; अण्णा हजारे यांचा रोष मुंडे आणि कोकाटेकडे

कृषी विभागातील घोटाळा, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी लावून धरली आहे.
आरोप होताच मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे; अण्णा हजारे यांचा रोष मुंडे आणि कोकाटेकडे
Published on

मुंबई : कृषी विभागातील घोटाळा, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी लावून धरली आहे. तर फसवणूक करून घर लादल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. त्यातच आता समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मुंडे व कोकाटे यांचे नाव नघेता, आरोप होताच मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.

समाजसेवक अण्णा हजारे वयाच्या ९० व्या वर्षी पुन्हा समाजसेवेत सक्रीय झाले आहेत. अहिल्या नगर येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मंत्री मंडळातील मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे, असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे कृषीमंत्री असलेले शशिकांत सुतार, सिंचन खात्याचे मंत्री असलेले महादेव शिवणकर, बबनराव घोलप, शोभा फडणवीस यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप होत आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांनी मुंडे व कोकाटे यांचे नाव न घेता नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे, असे अण्णा हजारे म्हणाले.

एकही डाग अंगावर न लागता जीवन जगतोय

तुम्हीच जर वाट सोडून चालला तर जनता कुठे जाणार? देश कुठे जाणार आहे. मंत्रिमंडळात असताना आरोप झाल्यावर एक क्षणसुद्धा पदावर राहू नये. लगेच राजीनामा दिला पाहिजे. आरोप होताच मंत्र्यांनी प्रथम राजीनामा देऊन बाहेर पडले पाहिजे. माझे वय ९० वर्ष झाले आहे. या ९० वर्षांच्या वयात एकही डाग नाही. एकही डाग अंगावर न लागता जीवन जगतोय तसे जीवन मंत्रिमंडळातील लोकांनी जगले पाहिजे. त्यामुळे राज्याचे आणि देशाचे नुकसान होणार नाही, असा टोला अण्णा हजारे यांनी मुंडे आणि कोकाटे यांना नाव न घेता लगावला.

logo
marathi.freepressjournal.in