निवडणुका आल्या की मनसेला 'सेटिंग' करावी लागते; ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची टीका

“निवडणूक आली की, मनसेची कुणाबरोबर तरी सेंटिग चालत असते. स्वत:च्या पक्षाचा खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य निवडून....
निवडणुका आल्या की मनसेला 'सेटिंग' करावी लागते; ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची टीका

मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर, महायुतीत चौथा भिडू म्हणून मनसे सामील होणार, अशी जोरदार शक्यता आहे. मनसेच्या या बदलत्या भूमिकेवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. निवडणुका आल्या की मनसेला सेटिंग करावी लागते, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार विनायक राऊत यांनीही टीकास्त्र सोडले आहे.

“निवडणूक आली की, मनसेची कुणाबरोबर तरी सेंटिग चालत असते. स्वत:च्या पक्षाचा खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य निवडून आणण्याची इच्छा मनसेच्या प्रमुखांकडे दिसत नाही. केवळ उद्धव ठाकरेंच्या द्वेषापोटी आणि त्यांना टक्कर देण्यासाठी कुठल्या तरी पक्षाशी हातमिळवणी करायची, हाच धंदा आतापर्यंत मनसेनी केला आहे. यावेळी त्याची पुनरावृत्ती होत असली तरी लोक त्याला पाठिंबा देणार नाहीत. त्यांचे या निवडणुकीत पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही,” अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी मनसेवर प्रहार केला.

“भाजपसोबत मनसेने युती केली तरी आम्हाला दु:ख वाटणार नाही. मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र त्याचे निश्चितच वाईट वाटेल. पक्षप्रमुख चुकीचे करत असल्याची भावना मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. भाजपचाही आता स्वत:च्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘गॅरंटी’वरचा भाजपचा विश्वास उडालेला असल्यामुळेच इकडच्या तिकडच्यांना गोळा करून आपली पोळी भाजपण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असेही विनायक राऊत म्हणाले.

राणेंच्या पराभवाची हॅटट्रिक होणार

माझ्या मतदारसंघात खुद्द पंतप्रधान येऊन प्रचार सभा घेणार आहेत, याचा मला आनंद वाटतो. एवढे करूनही भाजपच्या उमेदवाराचा पराभव होणार आहे. नारायण राणेंना जर याठिकाणाहून उभे केले तर त्यांच्या पराभवाची हॅटट्रिक होईल, असेही खासदार विनायक राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in