
पुणे : कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी महिलांचे सशक्तीकरण गरजेचे आहे. त्यामुळे महिलांना जुन्या व मागास परंपरातून मुक्त करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
सोलापूरच्या उद्योगवर्धिनी या स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, महिला या कोणत्याही समाजाचा महत्वाचा भाग असतात. पुरुष ज्याप्रमाणे जीवनभर काम करतो. तसेच महिलाही जीवनभर काम करतात. मात्र, त्या येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देण्याचे काम करतात. मुलांचे मन व संस्कार हे आईच्या प्रेमाने विकसित होत असते.
महिलांना आपण पुढे आणू, हा विचार पुरुषांनी करणे म्हणजे अहंकार आहे. पुरुषांनी असा विचार करणे गरजेचे नाही. महिलांना केवळ स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यांना मागास, जुनाट परंपरापासून मुक्ती दिली पाहिजे. त्यांना स्वत: विकसित होण्याची संधी दिली पाहिजे. जेव्हा एक महिला पुढे जाते तेव्हा ती संपूर्ण समाजाला पुढे घेऊन जाते, असे भागवत यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी उद्योगवर्धिनी संस्थेतर्फे महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
महिला सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी अनिवार्य!
महिला सशक्तीकरण केवळ समाजासाठी नाही तर संपूर्ण देशाच्या विकासासाठी अनिवार्य आहे. देवाने महिलांना एक अतिरिक्त गुण दिला आहे. त्यामुळे त्या ज्या करू शकतात ते पुरुष करू शकत नाहीत. मात्र, त्यांना पुरुषांसारखे सर्व गुण देवाने दिले आहेत. त्यामुळे त्या पुरुषांच्या बरोबरीने सर्व कामे करू शकतात, असे भागवत म्हणाले.