मुंबई : राज्याला गेले काही दिवस अवकाळी पावसाने झोडपले असताना सोमवारी दुपारनंतर मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसराला धुळीच्या वादळासह आलेल्या पावसाचा व गारांचा तडाखा बसला. ताशी ५० ते ६० किमी वेगाने धुळीचे लोट घेऊन वारे वाहू लागल्याने भरदुपारी अचानक मुंबई झाकोळून गेली. त्यानंतर जोरदार वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडवली. अचानक उठलेल्या या वादळाने मुंबईची चांगलीच दैना उडवली. घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून चार जण मृत्यूमुखी पडले असून, ५९ जण जखमी झाले आहेत. तर वडाळ्यात मेटल पार्किंग कोसळून एक जण जखमी झाला. मुंबईसह ठाणे परिसरातील रेल्वे, मेट्रो व विमान सेवा या वादळामुळे विस्कळीत झाली.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, कल्याण परिसरात वाढत्या उकाड्यामुळे प्रत्येकाचा घामटा निघत असताना सोमवारी दुपारनंतर धुळीच्या वादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली. त्यातच रेल्वे सेवाही कोलमडल्याने सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. दादरसह, वांद्रे, गोरेगाव, बोरिवली, दहिसर, कांदिवली, गोरेगाव, कुर्ला, भांडूप, विक्रोळी, विद्याविहार, शीव आदी ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. जोरदार वाऱ्यामुळे कुर्ल्यात काही घरांचे पत्रे उडाले. तर पालिका मुख्यालयाजवळील महापालिका मार्गासह अनेक ठिकाणी झाडे तसेच झाडाच्या फांद्या कोसळल्या.
वीज गायब, लिफ्ट बंद
जोरदार वाऱ्यामुळे मुंबईच्या अनेक भागात वीज गायब झाली. यामुळे अनेक ठिकाणी कामकाज ठप्प झाले. तर लिफ्ट बंद पडल्याने काही जण लिफ्टमध्ये अडकून पडले.
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी पाऊस
महाराष्ट्राच्या मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पाऊस झाला. याबाबत अलर्ट हवामान खात्याकडून देण्यातही आला होता. ही स्थिती काही तासांपुरतीच निर्माण झाली होती. यानंतर सर्व ठिकाणी स्थिती पूर्ववत झाली, असे कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.