Monsoon Update : अखेर राज्यात मान्सून सक्रिय; येत्या ४८ तासांत मुंबईत मान्सून दाखल होणार, हवामान खात्याची माहिती

गेल्या दोन आठवड्यांपासून दडी मारून बसलेला मान्सून अखेर राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, यामुळे बळीराजासह सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अखेर राज्यात मान्सून सक्रिय; येत्या ४८ तासांत मुंबईत मान्सून दाखल होणार, हवामान खात्याची माहिती
अखेर राज्यात मान्सून सक्रिय; येत्या ४८ तासांत मुंबईत मान्सून दाखल होणार, हवामान खात्याची माहिती प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : गेल्या दोन आठवड्यांपासून दडी मारून बसलेला मान्सून अखेर राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, यामुळे बळीराजासह सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या २४ ते ४८ तासांत मुंबईसह राज्याच्या उर्वरित भागांत मान्सून पोहोचण्यासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असे हवामान विभागाने सांगितले.

८ जून रोजी राज्यात दाखल झाल्यानंतर मान्सूनची प्रगती थांबली होती, मात्र तब्बल १४ दिवसांच्या खंडानंतर आता मान्सूनने पुणे, सोलापूर, धाराशिव आणि अलिबाग या भागांमध्ये आपले पाऊल ठेवले आहे.

उत्तर दिशेकडून येणारे कोरडे वारे आणि मान्सूनच्या वाऱ्यांच्या कमी झालेल्या तीव्रतेमुळे मान्सूनची वाटचाल थांबली होती. तसेच मान्सूनसाठी ‘एमजीओ’ घटक अनुकूल स्थितीत नव्हता. मात्र, आता ‘एमजीओ’ दुसऱ्या फेजमध्ये असून मस्करीन हाय आणि इतर विषुववृत्तीय लहरी मान्सूनसाठी पूरक ठरत आहेत, ज्यामुळे मान्सूनचे वारे पुन्हा एकदा बळकट झाले आहेत, अशी माहिती पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. उपग्रह नकाशांनुसार अरबी समुद्रासह कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पावसासाठी पोषक ढग जमा झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

येत्या तीन ते चार दिवसांच्या हवामान अंदाजाबाबत बोलताना डॉ. सानप यांनी सांगितले की, कोकण-गोव्यासह अंतर्गत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. २७ आणि २८ जून रोजी कोकण किनारपट्टीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच २४ आणि २५ जून रोजी घाटमाथ्यावर ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून तेथेही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्याचा विचार केल्यास, शहरात गेल्या काही दिवसांत पावसाची तीव्रता कमी-जास्त प्रमाणात होती, जसे की एनडीए परिसरात ८१ मिमी तर शिवाजीनगर येथे १८ मिमी पावसाची नोंद झाली होती; मात्र इथून पुढचा पाऊस हा मान्सूनचाच असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आतापर्यंत पावसाची ७० टक्के तूट

राज्यातील पावसाच्या एकूण आकडेवारीचा विचार केला असता, जून महिन्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ७० टक्क्यांहून अधिक पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. या वर्षाचा मान्सूनचा एकूण अंदाज सरासरीच्या ९० टक्के राहण्याची शक्यता असून, जून ते सप्टेंबर या काळात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहू शकतो.

मान्सून सक्रिय झाला असला तरी शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने आणि कृषी विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. केवळ पावसाचे आगमन झाले म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला डॉ. सानप यांनी दिला आहे.

येत्या ४८ तासांत मुंबईत मान्सून दाखल होणार

येत्या ४८ तासांत मुंबई शहरात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह मुंबईच्या विविध भागात काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्र परिसरातही हलक्या सरी बरसल्या.

हवामान विभागाने मुंबईसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच २९ जूननंतर पावसाचा जोर अधिक वाढेल, असा अंदाज आहे.

logo
marathi.freepressjournal.in