

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा २१ डिसेंबर २०२५ ला होणार होत्या, मात्र नगर परिषद निवडणुकांच्या मतमोजणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नगर परिषद निवडणुकांच्या मतमोजणीसाठी परीक्षा केंद्र व मतमोजणीचे ठिकाण यातील कमी अंतर, कर्मचाऱ्यांची कमतरता, वाहतूक कोंडी व इतर महत्त्वाच्या कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
आता परीक्षा कधी होणार?
गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.
आयोगाने परिपत्रकात काय म्हटले?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ च्या परीक्षेचे आयोजन दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ११.०० ते १२०० या कालावधीत करण्यात आले होते. तथापि, राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक ०२ डिसेंबर, २०२५ रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी असल्याने त्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली होती.
आयोगाने उपरोक्तप्रमाणे मागविलेल्या माहितीच्या अनुषंगाने काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यांनी परीक्षा आयोजित करण्यास अडचणी उद्भवू शकतात असे कळविले आहे. सदर वस्तुस्थिती विचारात घेता प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.
राज्यातील निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरलाच
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये २ डिसेंबरला २६४ नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी निवडणुका पार पडल्या. त्यानंतर सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरला एकत्र जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. त्यावर ५ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला. मतदान झाले असले तरीही २१ डिसेंबरच्याआधी मतमोजणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.