

मुंबई : ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ( एमपीएससी) प्रतिष्ठा अबाधित राहावी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या विद्यार्थ्यांना यथोचित न्याय मिळावा यासाठी पारदर्शी तसेच निष्पक्ष अशीच व्यवस्था उभारण्याचा माझा प्रयत्न आहे. तथापि माझ्याविरोधात कुणी एक जरी पुरावा दिला, तर एक क्षणसुद्धा मी या पदावर राहणार नाही’, अशा शब्दांत ‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सोमवारी आपल्यावर होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
‘एमपीएससी’च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या आरोपांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भीमनवार यांनी सोमवारी आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधी पक्षाकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यासाठी पुण्यात मोर्चाही काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा खुलासा केला. वस्तुस्थिती समोर असूनही सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
गुणात्मक, रचनात्मक सुधारणा केल्या...
मी पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून ‘एमपीएससी’मध्ये अनेक सुधारणा केल्या. स्पर्धा परीक्षेच्या आठ आणि सरळसेवा भरतीच्या ७६ चाळणी परीक्षा अशा एकूण ८४ परीक्षा यशस्वीपणे घेतल्या आहेत. शासनाकडून मागणी होण्यापासून ते निकाल जाहीर होईस्तोवर अनेक गुणात्मक आणि रचनात्मक सुधारणा केल्या. त्यामुळे १८ ते २१ दिवसांत निकाल जाहीर करणे शक्य झाले. निकाल जाहीर होण्यातील प्रदीर्घ विलंब कमी केला आणि एक महिन्यात निकाल जाहीर करता येईल, असे नियोजन केल्याचे भीमनवार यांनी म्हटले आहे.
उच्चस्तरिय समिती गठीत
प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांची पुनरावृत्ती न होण्यासाठी एक उच्चस्तरिय समिती ‘एमपीएससी’ने गठीत केली आहे. राज्य सरकारनेही एक उच्चाधिकार समिती गठीत करुन विभागीय स्तरावर जाऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी सल्लामसलतीची प्रक्रिया आरंभ केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.