दिग्विजय सिंह यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; मुंबई महापालिकेसाठी मविआत खलबते

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्यामुळे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र महाविकास आघाडी अबाधित राहावी, यासाठी...
दिग्विजय सिंह यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; मुंबई महापालिकेसाठी मविआत खलबते
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्यामुळे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र महाविकास आघाडी अबाधित राहावी, यासाठी काँग्रेस हायकमांडचे प्रयत्न असल्यामुळेच गुरुवारी काँग्रेसचे नेते आणि खासदार दिग्विजय सिंह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.

दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊणतास झालेल्या या चर्चेत मनसेला सोबत घ्यायचे की नाही, याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

दिग्विजय सिंह यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाविकास आघाडी जुळवून आणण्याबाबत प्रयत्न करावेत, असा प्रस्ताव दिला. मनसेला सोबत घेऊनच मुंबई महापालिका निवडणुका लढणार, असे ठाम मत ठाकरे यांनी यावेळी मांडल्याचे समजते.

भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची असली तरी मनसेबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत येत्या १४ डिसेंबरला बैठक घेऊन चर्चा करावी, अशी विनंती सिंह यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच दिल्लीला जाऊन खर्गे यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. दरम्यान, काँग्रेस आणि शिवसेनेच्या या बैठकीनंतर तिन्ही पक्षांमधील युतीबाबतचा अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in