जागावाटपासाठी ‘मविआ’ची ७ ऑगस्टला बैठक; रणनीतीसाठी काँग्रेसची ४ ऑगस्टलाही बैठक

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपामध्ये आपल्याला किती जागा मिळणार यावरून धास्तावलेल्या काँग्रेसने दोन बैठकांचे आयोजन केले आहे.
जागावाटपासाठी ‘मविआ’ची ७ ऑगस्टला बैठक; रणनीतीसाठी काँग्रेसची ४ ऑगस्टलाही बैठक
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपामध्ये आपल्याला किती जागा मिळणार यावरून धास्तावलेल्या काँग्रेसने दोन बैठकांचे आयोजन केले आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) यांची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे जागांबाबतचा दावा करण्यापूर्वी नेमके सूत्र ठरविण्यासाठी ४ ऑगस्टला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर जागावाटप आणि अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ‘मविआ’ची ७ ऑगस्टला बैठक होणार आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर बुधवारी हे जाहीर केले. जागावाटपाच्या निकषांवर चर्चा होणार आहे, जागांची अदलाबदल होऊ शकते, कारण विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनाच रिंगणात उतरविले जाणार आहे, असेही थोरात म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत संयुक्त सभाही घेणार आहे. काँग्रेसने मुंबईसाठी आणि उर्वरित राज्यासाठी अशा दोन बैठका घेण्याचे ठरविले आहे. येत्या रविवारी होणाऱ्या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे राज्यातील १० सदस्य समितीसमवेत हजर राहणार आहेत.

कॉंग्रेसची छाननी समिती

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने ज्येष्ठ नेते मधुसुदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची छाननी समिती नियुक्त केली आहे. त्यामध्ये काँग्रेसचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते आदींचा समावेश आहे. तिकीटवाटप आणि यादी अंतिम करण्यापूर्वी विविध नावांवर समिती चर्चा करणार आहे. मिस्त्री यांच्यासह समितीमध्ये सप्तगिरी संकर उलाका, मन्सूर अली खान आणि डॉ. सिरिवेलाल प्रसाद यांचा समावेश आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते हे छाननी समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत.

logo
marathi.freepressjournal.in